वारळ ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

अविश्वास ठरावावर विशेष सभा

| म्हसळा | प्रतिनिधी |

म्हसळा तालुक्यातील वारळ ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णतः अनागोंदीचा झाल्याचा आरोप ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात आला आहे. या संदर्भात स्थानिकांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त (कोकण), जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी, म्हसळा तहसीलदार व गटविकास अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना तक्रारीवजा निवेदन सादर केले आहे. या तक्रारींची दखल घेत म्हसळ्याचे गटविकास अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर केला आहे. त्या अहवालाच्या आधारे म्हसळा तहसीलदारांनी वारळ ग्रामपंचायतीतील सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठरावावर गुरूवारी (दि.7) सकाळी विशेष सभा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.

सरपंच कविता पेरवी व उपसरपंच किरण चाळके यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, ग्रामस्थांना उलटसुलट उत्तरे देणे, विकासकामांकडे दुर्लक्ष करणे, ग्रामपंचायत कारभारात पतीचा थेट हस्तक्षेप, पोलीस कारवाईच्या धमक्या देणे, कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे तसेच कोणतीही चूक नसताना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे, अशा गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत. याशिवाय गावातील खारलँड संदर्भात शासनाकडे दुरुस्ती प्रस्ताव न सादर करणे, मासिक सभा व ग्रामसभांमध्ये गंभीर त्रुटी, तसेच आर्थिक हिशोबात अनियमितता असल्याचेही तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबींमुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 39 अंतर्गत सरपंच व उपसरपंच यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात मधुसूदन पाटील, नरेश पाटील, चंद्रकांत पाटील, संजय माळी, वैभव चाळके, सुनीत सावंत, जगन्नाथ पाटील, नवाज काजी व मिना पाटील आदी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त (कोकण), जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी, म्हसळा तहसीलदार व गटविकास अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना तक्रारीवजा निवेदन सादर केले आहे. या तक्रारींची दखल घेत म्हसळ्याचे गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून दफ्तरी कागदपत्रांची छाननी करत विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर केला आहे. त्या अहवालाच्या आधारे म्हसळा तहसीलदारांनी वारळ ग्रामपंचायतीतील सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठरावावर विशेष सभा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. ही विशेष सभा गुरुवारी (दि.8) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, नोव्हेंबर 2023 पासून आजपर्यंत वारळ ग्रामपंचायतीत तब्बल पाच ग्रामसेवकांनी कार्यभार सांभाळल्याची माहिती गटविकास अधिकारी यांनी दिल्याचे बोलले जात आहे. या सततच्या बदलांमुळेही ग्रामपंचायतीच्या कारभारावर विपरीत परिणाम झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

Exit mobile version