वावे येथील खेडेकर यांनी जपली परंपरा; ग्रामीण भागात व्यवसाय तेजीत सुरु
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आधुनिकतेमुळे विजेवर चालणाऱ्या इस्त्रीला मागणी वाढली. त्यामुळे कोळशाच्या इस्त्रीचा व्यवसाय कालबाह्य होण्याच्या वाटेवर होता. मात्र, अलिबाग तालुक्यातील वावे येथील मारुती खेडेकर यांनी या व्यवसायाची 30 वर्षाची परंपरा आजही जपली आहे. वावे पंचकोशीतील अनेक ग्राहक आजही कोळशावर चालणाऱ्या इस्त्रीने प्रेस केलेल्या कपड्यांना पसंती दर्शवित आहेत. या व्यवसायाने अस्तित्व टीकवून ठेवले आहे.
कोळशाची इस्त्रीचा व्यवसाय पारंपारिक आहे. त्याला प्रचंड मागणी होती. मात्र, आधुनिकतेमुळे विजेवर चालणाऱ्या इस्त्रीचा क्रेझ वाढला. वजनाने हलक्या स्वरुपाच्या इस्त्री बाजारात दाखल झाल्या. अनेकजण कपडे घरी प्रेस करण्यापेक्षा बाहेर करण्यावर भर देऊ लागले. बदलत्या राहणीमानानुसार लॉन्ड्रीमधून कपडे प्रेस करण्याचा क्रेझ प्रचंड वाढला आहे. त्यामुळे कोळशावर चालणाऱ्या इस्त्रीचा व्यवसाय कालबाह्य होण्याच्या वाटेवर होता. हा व्यवसाय लुप्त होण्याच्या मार्गावर असताना, ग्रामीण भागासह निमशहरी भागात आजही विजेचा लपंडाव वाढत गेला. सतत वीज पुरवठा खंडीत होऊ लागल्याने विजेवर चालणाऱ्या इस्त्रीपेक्षा कोळशावर चालणाऱ्या इस्त्रीला आता मागणी वाढू लागली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोळशावर चालणाऱ्या इस्त्रीचा व्यवसाय तेजीत सुरु आहे. आधुनिकतेच्या युगात कोळशावर चालणारा इस्त्रीचा व्यवसाय टीकून ठेवण्याचे काम अलिबाग तालुक्यातील वावे येथील खेडेकरांनी केले आहे. मात्र, ग्राहकांच्या सेवेसाठी महागाईचा विचार न करता, रास्त दरात कपडे प्रेस करून देण्याचे काम केले जात आहे. गेल्या 30 वर्षापासून कोळशावर चालणारा व्यवसाय ते करीत आहेत. ग्रामीण भागात हा व्यवसाय हा तेजीत सुरु आहे.
ग्रामीण भागातील महाजने, बेलोशीसह मुळखानाव, सुडकोली, सराई, मल्याण, रामराज, कुणे, आंबेपूर, घोटवडे, काविर या भागातील दोनशेहून अधिक ग्राहक आजही कायम आहेत. या भागातील ग्राहक कोळशावर चालणाऱ्या इस्त्रीचे कपडे परिधान करण्यामध्ये पसंती दर्शवितात. कोळश्याचे दर वाढले असले, तरी हा व्यवसाय जपण्याचे काम खेडेकर या व्यावसायिकांनी केले आहे. घरच्या घरी हा व्यवसाय सुरु ठेवला आहे. त्यामुळे आधुनिकतेमध्ये हा व्यवसाय तग धरून असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या तीस वर्षापासून कोळशावर चालणारा इस्त्रीचा व्यवसाय चालू आहे. ग्रामीण भागातील वावे परिसरातील व अन्य भागातील ग्राहक कोळशावर चालणाऱ्या इस्त्रीचे कपडे घालण्यावर भर देतात. त्यामुळे आजही व्यवसाय तेजीत असून ग्राहकांकडून चांगली प्रतिसाद मिळत आहे.
मारुती खेडेकर
व्यावसायिक







