रामराज विभाग प्रीमियर लीग पर्व चौथे; निर 11 ताजपूर संघ ठरला उपविजेता
| रायगड | प्रतिनिधी |
ग्रामस्थ व महिला मंडळ नांगरवाडी आयोजित रामराज ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच मोहन दत्तात्रेय धुमाळ पुरस्कृत रामराज विभाग प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाचा चिचबादेवी राजेवाडी नवघर संघ अंतिम विजेता ठरला. अंतिम सामन्यात चिचबादेवी संघाने निर 11 ताजपुर संघाचा 10 गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेत निर 11 ताजपुर संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत एम झेड सप्लायर्स उमटे संघाने तृतीय क्रमांक तर फरीहा 11 रामराज मोहल्ला संघाने चतुर्थ क्ररांक पटकावला. या स्पर्धेसाठी दैनिक कृषीवल माध्यम प्रयोजक होता.
रामराज विभाग प्रीमियर लीगच्या बक्षीस समारंभाला व्यासपीठावर रामराजचे माजी सरपंच मोहन दत्तात्रेय धुमाळ, विक्रांत वार्डे, महादेव पाटील, महेश झावरे, गिरीश पाटील, सुनील धुमाळ, विकास झावरे, गजानन पालकर, संजय धुमाळ. चंद्रकांत बामणे, मानसी धुमाळ, प्रियांका पाटील , संगीता शेळके, अनिल पाटील, चंद्रकांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम सामना निर 11 ताजपुर आणि चिचबादेवी राजेवाडी नवघर या दोन संघांमध्ये रंगला. प्रथम फलंदाजी करताना निर 11 ताजपुर संघाने पाच षटकांमध्ये चिचबादेवी राजेवाडी नवघर संघापुढे विजयासाठी 49 धावांचे लक्ष ठेवले. पाच षटकांच्या सामन्यात चिचबादेवी राजेवाडी नवघर संघाने एक ही गडी न गमावता विजयाचे लक्ष्य पार केले. चौथ्या षटकांच्या तिसऱ्या चेंडूवर अनिकेत चिखले याने विजयी फटका मारला. त्यापूर्वी चिचबादेवी राजेवाडी नवघर संघाचा कर्णधार महेश वाघमारे याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.

उपांत्य फेरीचा पहिला सामना फरीहा 11 रामराज मोहल्ला आणि निर 11 ताजपुर संघ यांच्यात रंगला. या सामन्यात निर 11 ताजपुर संघाने पाच षटकात 72 धावांचे लक्ष फरिहा 11 रामराज मोहल्ला संघाला दिले होते. धावांचा पाठलाग करताना फरिहा 11 रामराज मोहल्ला संघाच्या फलंदाजांची दमछाक झाली. हा उपांत्य फेरीचा सामना निर 11 ताजपुर संघाने 22 धावांनी जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीचा दुसरा सामना चिचबादेवी राजेवाडी आणि एम झेड सप्लायर्स उमटे या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यात एमझेड सप्लायर्स उमटे संघाने 5 षटकात 52 धावांचे लक्ष चिचबादेवी राजेवाडी संघासमोर ठेवले होते. या सामन्यात प्रत्युत्तर देताना चिचबादेवी संघाने पहिल्या षटकात 36 धाव करून अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल केली. या संघातील सलामीचा फलंदाज अनिकेत चिखले याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामना खेचून आणला. हा सामना चिचबादेवी राजेवाडी संघाने आठ गड्यांनी जिंकून फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.
उपउपांत्य फेरीचा पहिला सामना नीर 11 ताजपूर संघ विरुद्ध महेश झावरे पुरस्कृत भिलजी यांच्यात झाला. या सामन्यात नीर 11 राजापूर संघाने विजय मिळवला. दुसरा सामना चिंचबादेवी राजेवाडी नवघर आणि अन्वी 11 रामराज कोळीवाडा यांच्यात झाला. या सामन्यांमध्ये चिंचबादेवी राजेवाडी नवघर संघ विजयी झाला. तिसरा सामना अर्णव 11 भोनंग विरुद्ध एम झेड सप्लायर्स यांच्यात झाला. या सामन्यात एम झेड सप्लायर्स उमटे संघ विजयी झाला. चौथा सामना फरिहा 11 रामराज मोहल्ला आणि आई जाखमाता दिवी पारंगी या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यात फरिहा 11 रामराज मोहल्ला संघाने विजय संपादन केला.
उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान
रामराज विभाग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील मालिकवीराचा मान 11 ताजपुर संघातील ऋषिकेश झावरेने मिळविला. त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 119 धाव आणि सहा फलंदाज बाद केले. त्याला मान्यवरांच्या हस्ते दुचाकी आणि चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेमध्ये फलंदाजीच्या जोरावर 112 धावा करणारा अनिकेत चिखले उत्कृष्ट फलंदाज ठरला त्याला दुचाकी सायकल आणि चषक तर आपल्या गोलंदाजीच्या कौशल्याने संघाला अंतिम
फेरीपर्यंत घेऊन जाणारा हार्दिक धुमाळ लीगमध्ये सहा गडी बाद करून उत्कृष्ट गोलंदाज ठरला. त्याला सायकल आणि चषक देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या क्षेत्ररक्षणाने झेल आणि धावा वाचविणारा रुद्राक्ष खारकर याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सायकल आणि चषक देऊन गौरविण्यात आले.







