| पाली | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी मंगळवारी (दि.13) रोजी ग्रुप ग्रामपंचायत वर्हाड-जांभूळपाडा येथे भेट देऊन ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामे व प्रशासनाच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या भेटीदरम्यान मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. प.) विशाल तनपुरे, गट विकास अधिकारी लता मोहिते, सहाय्यक गट विकास अधिकारी घरत, पंचायत व विस्तार अधिकारी (ग्रा. प.) आविनाश घरत तसेच अहिरे उपस्थित होते.
मान्यवर अधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची सखोल पाहणी केली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामकाजाची तपासणी करून नोंदवही, योजना अंमलबजावणी, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षणाशी संबंधित बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील सुविधा, उपस्थिती, स्वच्छता व सेवा दर्जाची पाहणी करण्यात आली. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सेवांमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने मान्यवर अधिकाऱ्यांनी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत भोसले यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व संबंधित यंत्रणेच्या कार्याचे कौतुक केले. तसेच शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी
