। मुंबई । वृत्तसंस्था ।
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटताना दिसत आहेत. युक्रेनमध्ये असलेले नागरिक जीव मूठीत घेऊन राहत आहेत. तर, परदेशातून शिक्षण व नोकरीसाठी आलेले विद्यार्थी व नागरिक मायदेशी परतण्यासाठी धडपड करीत आहेत. यामध्ये भारतीयांचाही समावेश आहे. 20 हजाराहून अधिक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांच्या सुखरुप सुटकेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युक्रेनमधील परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक तिथे अडकले आहेत त्यांची तिथे काय व्यवस्था आहे तसेच त्यांना सुखरुप मायदेशी घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. अशी माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकरांचे रायगडकरांना आवाहन
रशिया-युक्रेन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेले रायगड जिल्ह्यातील कोणी नागरिक असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी 02141-22297 / 8275152363 व 1800118797 (टोल फ्री), 011-23012113, 011-23014104, 011-23017905, फॅक्स नं.-011-23088124 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.