आईच्या दागिन्यांवर मुलाचा डल्ला

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात चोरी झाली होती. घरातील 44 हजार रुपयांचे दागिने चोरांनी लंपास केले होते. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासाची शिकस्त करत चोरी उजेडात आणली आहे. यात मुलानेच दागिने चोरले असल्याचे समोर आली आहे.
भिसेगाव येथील अर्चना मोरे यांचे घरातील कपाटातील 44 हजार 100 रुपयांचे सोन्याचे दागिने 2 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान चोरले असल्याची तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास अशोक राठोड हे करीत होते. घटनेची एकंदर परिस्थिती पाहता त्यांनी संशयित म्हणून फिर्यादी यांचा आरोपी मुलगा कृष्ण मोरे यास चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले.त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. पोलिसांनी त्यास विश्‍वासात घेवून चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेले सोन्याचे दागिने हे त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने कर्जत शहरातील तीन दुकानदारांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ,अनिल घेरडीकर, सुवर्णा पत्की सुभाष पाटील, अशोक राठोड, भूषण चौधरी, गणेश पाटील, अश्रुबा बेद्रे यांनी केली आहे.

Exit mobile version