शासकीय यंत्रणा जबाबदार असल्याचा जनतेचा आरोप; नालेसफाईच्या नावाखाली लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, ठेकेदार मालामाल
। उरण । घन:श्याम कडू ।
गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उरण बुडाले असून शहरात व अनेक गावात घरांना पाणी घुसून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. याला सर्वस्वी शासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप तालुक्यातील जनतेकडून केला जात आहे. यापूर्वीच आम्ही उरण बुडणार असे भाकीत वर्तविले होते ते आता खरे ठरताना दिसत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही नागरिकांनी सांगितले.

उरण तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे हे खरं आहे. परंतु हा विकास होत असताना जे नियोजन हवे आहे ते होताना दिसत नाही. कोणताही प्रकल्प अथवा योजना यांची नियमानुसार अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यात जी काही नैसर्गिक पाणी जाण्याचे मार्ग होते ते बंद करण्यात आले आहेत. तसेच जी काही बांधकामे उभी रहात आहेत ती कायदेशीरच्या नावाखाली बहुतांश बेकायदेशीर आहेत. तसेच अनेक ठिकाणच्या महसूल, गुचरण, वन, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी शासकीय जागांवरील खारफुटीची कत्तल करून भराव केल्यावर त्यावर अतिक्रमणे उभी राहिली आहेत. सदर अनधिकृत बांधकामे ही काही एका रात्रीत उभी राहिलेली नाहीत. याबाबत वर्तमानपत्रात अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध होऊनही याबाबत येथील शासकीय यंत्रणा कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत. केली तरी थातुरमातुर कारवाई करून त्यांना आर्थिक साटेलोटातून त्यांची पाठराखण केली जात आहे. यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा कशा प्रकारे करावयाचा याची कोणतीच ठोस अशी उपाययोजना नसल्याचे दिसते.

उरणमध्ये तहसिल, नगरपालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, जेएनपीटी, वन विभाग यांच्या अखत्यारीत अनेक जागा असूनही त्यावर मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्याविरोधात अनेकवेळा वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध होऊनही कोणतेच प्रशासन कारवाई करीत नाहीत. उलट त्यांना पाठीशी घालण्याचे काम ते इमानदारीने करीत असतात. त्यामुळे अशा लोकांचे फावत आहे. अशी परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी असल्याचा डांगोरा काही शासकीय अधिकारी पिटतील पण त्याला सर्वस्वी सर्व क्षेत्रातील शासकीय यंत्रणा, राजकीय नेतेगण, ठेकेदार हेच सर्वस्वी जबाबदार हे कोणीही नाकारू शकत नाही अशी चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस नालेसफाईच्या नावाखाली करोडो रुपयांची कामे कागदोपत्री काढली जातात. परंतु प्रत्यक्षात नालेसफाई न करताच बिले काढली जातात. तर काही ठिकाणी 3 ते 4 कोटीचे काम असेल तर त्यातील फक्त एक ते दीड कोटी खर्च करून थातुरमातुर काम करून ठेकेदार मोकळा होतो. या रॅकेटमध्ये सर्वजणांचे आर्थिकहीत संबंध अडकलेले आहेत. हे न समजण्याइतपत जनता दुधखुली राहिलेली नाही. पावसाळी पडणार्या पावसाचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात येऊनही परिस्थिती जैसे थे आहे. याबाबत ठेकेदार व त्यांचे चमचे आता गावात पाणी शिरणार नाही अशा बढाया मारीत होते. त्यांचे 2 ते 3 दिवस पडणार्या पावसाने पितळ उघडे पाडल्याने त्यांची दातखिळी बसली आहे.आम्ही पावसाळ्यापूर्वीच उरण बुडणार या मथळ्याखाली ठळकपणे वृत्त प्रसिद्ध केले होते ते आज खरे ठरले आहे. अजून पावसाळा जायचा आहे तोपर्यंत उरणकरांचे हाल बेहाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून शासकीय अधिकारी, जनतेचे रक्षक व ठेकेदार अशी मोठ्या लॉबीचे आर्थिक हीतसंबंध असल्याने उरणकरांची या जाचातून सुटका होईल असे वाटत नाही.