उड्डाणपुलाखालील बेघरांमुळे शहराला अवकळा

नवी मुंबईच्या सौंदर्याला बाधा; पालिकेचा कानाडोळा

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेमध्ये देशात तिसरा क्रमांक आणि राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. असे असताना शहराच्या उड्डाणपुलाखाली मात्र बेघरांनी संसार थाटल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. महापालिकेकडून ठिकठिकाणी उड्डाणपूल स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केला जात असताना, या बेघरांच्या तांड्यांनी परिसराला अवकळा आली आहे.

स्वच्छ शहर म्हणून देशात नाव कमावलेल्या नवी मुंबई शहरातील उद्याने, रस्ते, मोकळे भूखंड, रस्त्यांच्या बाजूच्या जागाही स्वच्छ व सुशोभित करण्यात आल्या आहेत. त्यात उड्डाणपुलाखालील जागाही सुशोभित करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार सानपाड्यामधील उड्डाणपुलाखाली फुटबॉलसाठी मैदान विकसित करण्यात आले आहे. मात्र शहरातील अन्य ठिकाणच्या उड्डाणपुलाखालील जागांकडे अजूनही पालिकेचे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे येथील जागेत बेघर, भिकारी आणि भटक्या लोकांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे उडाणपुलाखाली घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तेथेच सर्व विधी उरकले जात असल्याने परिसर गलिच्छ होऊन दुर्गंधी येऊ लागली आहे. वाशी, सानपाडा, घणसोली, ठाणे-बेलापूर मार्गावरील कोपरखैरणे या ठिकाणच्या उड्डाणपुलाखाली असणार्‍या मोकळ्या जागेत बेघरांची गर्दी दिसून येत आहे. महापालिकेने बेघरांचे स्थलांतर करून हा परिसर स्वच्छ करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. त्यामुळे पालिकेकडून येथील बेघरांना हटवण्यासाठी उड्डाणपुलाखाली जाळ्या बसवण्यात आल्या होत्या, पण या जाळ्या तोडून बेघरांनी आतमध्ये प्रवेश करून पुन्हा आपला संसार थाटल्याचे दिसून येत आहे.

उड्डाणपुलाखालील जागा स्वच्छ करून तिथे खेळांसाठी मैदान तयार केले जात आहे. मात्र सायन-पनवेल महामार्गाचा उड्डाणपूल आपल्या हद्दीत येत नसल्याने येथे काही करता येत नाही. मात्र आता या जागाही स्वच्छ, सुंदर कशा करता येतील, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

बाबासाहेब राजळे, उपआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन
Exit mobile version