। मुंबई । वृत्तसंस्था ।
उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि बर्फवृष्टीचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. सर्वत्र किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. तसेच बहुतांशी भाग सकाळच्या सुमारास धुक्यात हरवून जात आहे. पुढील किमान आठवडाभर तरी मुंबई व उर्वरित राज्यात थंडीची तीव्रता अधिक असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. सर्वत्र हवेत गारठा वाढला असून नागरिक सकाळच्या सुमारास या सुखद गारव्याचा आनंद घेताना दिसून येत आहे.
राज्याच्या काही जिल्ह्यांत गेले काही ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणामुळे संबंधित जिल्ह्यांतून जवळपास थंडी गायबच झाली होती. मात्र आता वातावरणात बदल झाला असून कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे.
अनेक जिल्ह्यांतील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. शहरी भागातील नागरिक गुलाब थंडीमध्ये मॉर्निंग वॉकचा आनंद घेत आहेत. ग्रामीण भागात कमालीचे धुके पसरले असून गावे धुक्याच्या साम्राज्यात हरवून गेली आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागातील लोक शेकोट्या पेटवताना दिसून येत आहेत.