| पनवेल | प्रतिनिधी |
इत्राईल सरोवर परिसरातील संरक्षण भिंत अनेक वर्षांपासून पडलेल्या अवस्थेत आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. भिंत कोसळल्यामुळे परिसर असुरक्षित बनला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पडलेल्या भिंतीलगत मोठ्या प्रमाणावर चारचाकी वाहने पार्क केली जात असून कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरोवराच्या कडेला संरक्षक भिंत नसल्यामुळे वाहनांसह नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. तसेच, भिंत तुटलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून परिसर अस्वच्छ झाला आहे. यामुळे दुर्गंधी पसरत असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
दरम्यान, सरोवराचे सुशोभीकरण व सुरक्षितता यासाठी तातडीने भिंत दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करावा. तसेच, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अपघात टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
