। गडचिरोली । वृत्तसंस्था ।
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी साखरा गावातील शेतकर्याच्या शेतात जावून प्रत्यक्ष भात रोवणी केली. जिल्ह्यात दमदार पावसानंतर सर्वच शेतकर्यांनी भात रोवणीला सुरूवात केली आहे. साखरा गावात कृषी विभागाने आयोजित केलेल्या रोवणी कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी उत्पन्न वाढीसाठी शेतकर्यांना आता यांत्रिकीकरण स्विकारले पाहिजे ,असे आवाहन शेतकर्यांना केले.
परंपरागत शेतीमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते, तसेच उत्पन्नही काही अंशी कमी राहते. यातून बाहेर पडून शेतकर्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी जेणेकरून उत्पन्नही वाढेल आणि मेहनतही कमी करावी लागेल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. साखरा येथे झालेल्या युवराज उंदीरवडे यांच्या शेतातील रोवणी कार्यक्रमाला जिल्हाअधीक्षक, कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्हाटे, नाबार्ड जिल्हाप्रमुख राजेंद्र चौधरी, कृषी अधिकारी अरूण वसवाडे, बालाजी कदम, पी.पी.वाहने व स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
जिल्ह्यात पावसामध्ये थोडासा खंड पडलेला होता. आता मागील दोन दिवसात चांगला पाऊस झाल्याने धान रोवणीसाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे. अशावेळी जिल्हाधिकारी यांनी शेतकर्यांच्या बांधावर जावून त्यांना प्रोत्साहन दिले. कृषी विभागाने नियोजन व मानव विकास योजनेतून ट्रॅक्टर वाटप व आवश्यक इतर सयंत्र वाटप योजना घेतली आहे. यातून शेतीमधील उत्पन्न वाढीबरोबरच त्यांचा शेतीमधील इतर ताणही कमी होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. येत्या काळात जिल्ह्यातील रब्बी मधील पेरणी क्षेत्र वाढविण्यासाठीही उपाय योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यांत्रिकीकरण योजनेत जिल्ह्यात 40 मशीन घेण्यात येत आहेत. त्यातून किमान प्रती मशीन 100 एकर क्षेत्र पेरून यांत्रिकीकरणाला चालना दिली जाणार आहे.