चंद्राभोवती फिरणार्‍या चांद्रयान 2 ची टक्कर टळली

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इस्त्रोचे चांद्रयान 2 हा उपग्रह ऑगस्ट 2019 पासून सुमारे 100 किलोमीटर उंचीवरुन चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. तर नासाचा उपग्रह जून 2009 पासून चंद्राभोवती 20 किलोमीटर ते 1800 किलोमीटर अशा लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत चंद्राचा अभ्यास करत आहे. हे दोन्ही उपग्रह चंद्राच्या उत्तर ध्रुवावरुन जात असतात. मात्र या दोन्ही उपग्रहांची टक्कर होणार होती.ती सुदैवाने टळली आहे.
चंद्राभोवती फिरणार्‍या नासाच्या आणि इस्त्रोच्या या उपग्रहांची टक्कर ही 20 ऑक्टोबरला भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 11 वाजुन 15 मिनीटांनी होणार होती. यावेळी या दोन्ही उपग्रहांच्या कक्षेमध्ये 100 मीटरपेक्षा कमी अंतर असणार होते. या उपग्रहांचा आकार आणि सोलर पॅनेलचा विस्तार बघता ही टक्कर अटळ होती. अर्थात नासा आणि इस्त्रो या अवकाश संस्थांना हा संभाव्य धोका काही दिवस आधीच लक्षात आला. दोन्ही संस्थांनी चर्चा केल्यावर इस्त्रोने चांद्रयान 2 ची कक्षा बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा 18 ऑक्टोबरला म्हणजे संभाव्य टक्कर होण्याच्या दोन दिवस आधीच इस्त्रोने चांद्रयान 2 च्या कक्षेत बदल केला आणि चंद्राच्या भोवती उपग्रहांची होणारी टक्कर ही टाळण्यात आली.

Exit mobile version