ग्रामपंचायतीच्या कचऱ्याची जबाबदारी कंपनीने घ्यावी

माजी आ. पंडित पाटील यांची मागणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

करोडो रुपये कमविणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मुलभूत सुविधांचा भार, वसाहतीअभावी जवळच्या ग्रामपंचायतीवर पडत आहेत. मात्र, या ग्रामपंचायतीवर कंपनी सीएसआर निधी खर्च न करता, संबंध नसलेल्या ग्रामपंचायतीवर करीत आहेत, असा आरोप माजी आ. पंडित पाटील यांनी केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कचऱ्याची जबाबदारी कंपनीने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

पेण तालुक्यातील डोलवी येथे गेल्या अनेक वर्षापासून जेएसडब्ल्यू कंपनी आहे. या कंपनीत हजारो कर्मचारी काम करीत आहेत. कंपनीची स्वतंत्र कर्मचारी वसाहत नसल्याने येथील कर्मचारी शहाबाज, आंबेपूर, पोयनाड, शहापूर या ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीवर मोठा ताण पडत आहे. मात्र, कंपनी या ग्रामपंचायतीमध्ये सीएसआर निधी खर्च न करता अन्य ग्रामपंचायतीवर करीत आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये निधीची तरतूद केल्यास कंपनीच्या कामगारांनादेखील अधिक चांगल्या सुविधा देता येणे शक्य होणार आहे. नवी मुंबई येथील कचऱ्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी सिडको करीत आहे. त्याप्रमाणे जेएसडब्ल्यू कंपनीने शहापूर, शहाबाज, आंबेपूर, पोयनाड ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे.

कंपनी वडखळला मात्र सीएसआर श्रीवर्धन, मुंबईला दिला जात आहे. कंपनीमुळे प्रदुषण होत आहे.या प्रदूषणाचा ग्रामपंचायतीमधील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कंपनीने सीएसआर कुठे खर्च केला याची यादी प्रसिध्द करावी अशीदेखील मागणी यावेळी त्यांनी केली.

Exit mobile version