संकुलाचे मैदान फुटबॉलसाठी अयोग्य

आतापर्यंत तीसहून अधिक खेळाडूंना दुखापत

| रायगड जिल्हा | प्रमोद जाधव |

अलिबागमधील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे. परंतु, क्रीडा संकुलामधील मैदान फुटबॉल खेळण्यायोग्य नसल्याचा फटका खेळाडूंना बसत आहे. वाढलेले गवत पूर्ण कापले नसल्याने या मैदानात धावताना खेळाडूंना वारंवार दुखापत होत आहे. काही ठिकाणी दगडमाती असल्याने खेळताना अडचणी निर्माण होत आहेत. आतापर्यंत तीसहून अधिक खेळाडूंना दुखापत झाली असून, दोन खेळाडूंना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

करोडो रुपये खर्च करून दहा वर्षांपूर्वी जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात आले. धावपट्टीपासून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. परंतु, त्यांची वेळेवर देखभाल दुरुस्ती होत नसल्याने क्रीडा संकुलाची अवस्था बिकट झाली आहे. मैदानात ठिकठिकाणी गवत वाढले आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. मंगळवार (दि.9) पासून अलिबागमधील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. फुटबॉल खेळण्यायोग्य मैदान नसल्याने या खेळाडूंचे प्रचंड हाल होत असल्याची माहिती समोर आली आहे.
मैदानातील गवत पूर्ण न काढल्याने गवतातून धावताना अनेकवेळा पायाला दुखापत होण्याच्या घटना घडत आहे. या तीन दिवसांमध्ये सुमारे आठहून अधिक जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. यातील एकाला गंभीर दुखापत झाली असल्याने अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. पनवेल तालुक्यातील पळस्पे येथील हा खेळाडू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. फुटबॉल खेळण्यासाठी लागणारे सुसज्ज मैदान नसल्याने येथील अनेकखेळाडूंना अन्य ठिकाणी जावे लागत आहे.

तीसपेक्षा अधिक खेळाडूंवर उपचार
अलिबागमधील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये चार दिवसांपासून फुटबॉल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत दुखापत होणाऱ्या खेळाडूंवर तातडीने प्राथमिक उपचार करण्याचे काम आरोग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे. आतापर्यंत तीसहून अधिक खेळाडूंवर उपचार केले आहेत. त्यात 15 व 19 वर्षाखालील अशा दोन खेळाडूंना गंभीर दुखापत झाली. त्यांना 108 व 102 रुग्णवाहिकेमार्फत अधिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

अलिबागमध्ये जिल्हा क्रीडा संकुल बांधले आहे. परंतु, या संकुलाची वेळेवर देखभाल दुरुस्ती होत नाही. त्यामुळे खेळाडूंना योग्य असे मैदान उपलब्ध होत नाही. क्रीडा संकुलामध्ये फुटबॉल खेळण्यायोग्य मैदान नाही. त्यामुळे खेळाडूंना दुखापत होण्याच्या घटना कायमच घडत असतात. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुसज्ज असे मैदान असणे आवश्यक आहे.

खेळाडू (नाव न सांगण्याच्या अटीवरून)

गवत कापण्यापासून सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मैदानामुळे कोणाला त्रास झाल्याचे दिसून आले नाही. सहा महिन्यांपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असून, आगामी काळात सुसज्ज अशी धावपट्टी व स्विमींग पूल तयार केला जाणार आहे.

प्रकाश वाघ,
जिल्हा क्रीडा अधिकारी

Exit mobile version