| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कल्याण-कर्जत रस्त्यावरील आंबिवली फाटापासून आंबिवली गाव आणि तेथून एकसल गावाकडे जाणारा रस्ता काँक्रीटचा बनविला जात आहे. या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपूर्वी सुरु झाले होते. त्यानंतर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात झाली. परंतु, या रस्त्यावर काँक्रटीकिरण करण्यासाठी टाकण्यात आलेले सिमेंट निघून जात आहे. त्यामुळे या कामाची शासनाने चौकशी करण्याची मागणी स्थानिक आंबिवली गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरून आंबिवली गावाकडे जाणारा रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम मंजूर झाले आहे. या रस्त्यावर 5 कोटी खर्चून रस्ता बनविला जाणार आहे. या रस्त्याचे राज्यमार्ग रस्त्यापासून आंबिवली गावापर्यंत आणि तेथून एकसलकडे जाणारा रस्ता काँक्रीटचा बनविला जात आहे. या कामाला 2025मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर मागील महिन्यापासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून ठेकेदाराकडून कासवगतीने काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातही काही ठिकाणी रस्ता रुंद तर काही ठिकाणी अरुंद असे काम सुरु आहे. त्याचवेळी रस्त्याचे बांधकाम केल्यावर पाण्याचा वापर केला जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दुसरीकडे या रस्त्यावर काँक्रीट कामामधील जेसीबी हे अनेक ठिकाणी रस्त्यावर निखळले आहे. त्यामुळे नित्कृष्ट दर्जाचे काँक्रीटीकरण करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.







