एसटी संपामुळे फिरत्या विक्रेत्यांचे हाल

। सुधागड-पाली । वार्ताहर ।
मागील महिनाभरापासून एसटीचा संप सुरू आहे. परिणामी स्थानकात प्रवाशांची रेलचेल पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे स्थानकातील शेकडो फिरते विक्रेते, टपरीवाले, रसवंती चालक व दुकानदारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. आधी लॉकडाऊन आणि आता एसटी कर्मचार्‍यांचा संप अशा परिस्थितीत उदरनिर्वाह कसा चालवावा हा प्रश्‍न या सर्वांसमोर निर्माण झाला आहे.
पाणी बाटली, कोल्ड्रिंक्स पासून वेफर्स, चिकी वडापाव व फळ विक्रेते आदींचा स्थानकातील आवाज थांबला आहे. जिल्ह्यात पनवेल, पेण, रामवाडी, अलिबाग, कर्जत, खोपोली, श्रीवर्धन, माणगाव, इंदापूर, पोलादपूर व महाड आदी बस स्थानकांवरून लांब पल्ल्याच्या एसटी बसेसची येजा असते. इतरही स्थानकांत ती पहायला मिळते. या बस स्थानकात स्थानकात येणारे बसमधील प्रवाशी हेच या फिरते विक्रेते, छोटेमोठे हॉटेल चालक, भाजी विक्रेत्या, टपरीवाले व दुकानदारांचे हक्काचे ग्राहक असतात. मात्र स्थानकात बसच येत नाहीत म्हंटल्यावर प्रवाशी तरी कुठून येणार? परिणामी हे व्यवसाईक पुरते हतबल झाले आहेत. फिरते विक्रेते तर हाताला मिळेल ते काम करत आहेत.अनेक दुकानदारांनी आगाऊ माल भरून ठेवला आहे. यातील बरेचसे खाद्य पदार्थ आहेत. त्यांची मुदत संपली आहे. तर काही माल खराब झाला आहे. यामुळे हे दुकानदार तोट्यात आहेत. एकूणच एसटी संपामुळे इतरही आर्थिक व्यवहार डबघाईला आले आहेत.

वडिलांचे बस स्थानकात छोटे दुकान आहे. महिनाभरापासून एसटीचा संप असल्याने खूप नुकसान झाले आहे. दुकानाचे भाडे देखील भरावे लागते. दुकान दिवसभर उघडे ठेवूनही ग्राहक फिरकत नाहीत.  -हेमंत राऊत, व्यवसाईक, पाली
Exit mobile version