पाच्छापूर रस्त्याची अवस्था बिकट

वारंवार पर्यटक, ग्रामस्थांची वाहने चिखलात

| पाली | वार्ताहर |

तालुक्यातील पाच्छापूर ते दर्यागाव या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. त्यातच पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून राडारोडा झाला आहे. यातून ग्रामस्थांना, पर्यटकांना जिकरीचा प्रवास करावा लागत असून पर्यटक व ग्रामस्थांची वाहने चिखलामध्ये वारंवार फसली जात आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे व यातच अपूर्ण असलेला पाच्छापूर ते दर्यागाव रस्ता त्यामुळे रस्त्यावर चिखलाचा राडारोडा झाला असून त्या चिखलात सुधागड किल्ल्यावर येणारे पर्यटक व स्थानिक नागरिकांची वाहतुकीसाठी असणारी वाहने ही चिखलात फसत आहेत. दरम्यान नागरिकांच्या मागणीवरून उपाययोजना म्हणून चिखल असलेल्या रस्त्यावर ठेकेदाराकडून जेऐसबी मटेरियल टाकण्यात आले परंतु ती उपाययोजना फोल ठरली किंबहुना त्याकरिता आलेले डंपर हेच त्या चिखलात फसले होते. त्यामुळे पर्यटक व नागरिकांना बराच वेळ ताटकळत रहावे लागले.

याबाबत स्थानिकांनी याआधी सुधागड तालुका तहसीलदार यांना निवेदन दिले होते मात्र तरीसुद्धा प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करण्यात आली नाही. जुलै ते सप्टेंबर या महिन्यात पावसाचे प्रमाण खूप असते त्यामुळे अशा पावसात तर नागरिकांना घराबाहेरदेखील पडणे कठीण होईल. परिणामी शाळकरी विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होईल तर नोकरदार,आबालवृद्ध, आजारी व्यक्ती यांना देखील अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. त्यामुळे नागरिकांना यापुढे होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण? ठेकेदाराच्या हालगर्जीपणाचा परिणाम नागरिकांना सोसावा लागणार? सुधागड तालुका प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

पाच्छापूर ते दर्यागाव या मार्गाची अवस्था फारच बिकट असून ऐन पावसाळ्यात नागरिकांना चिखलाचा सामना करावा लागत आहे. अवजड वाहने याचबरोबर लहान चारचाकी वाहने रस्त्यावरील चिखलात फसत आहेत. नागरिकांना तासनतास ताटकळत राहवं लागत असून शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ठेकेदाराकडून केलेली तात्पुरती उपाययोजना कुचकामी ठरत आहे. या परिस्थितीकडे ठेकेदार पाठ फिरवीत आहे.

सिद्धांत गायकवाड,
स्थानिक पाली
Exit mobile version