डागडुगी करण्याची माजी सैनिक संघटनेची मागणी
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव शहरातील सैनिक विश्रामगृहाची अवस्था अत्यंत दयनीय असून, संपूर्ण इमारत जीर्ण अवस्थेत झाली आहे. या विश्रामगृहाचे डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी वीर यशवंतराव घाडगे माजी सैनिक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
माणगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी कचेरी रोडला असलेल्या सैनिक विश्रामगृहाचे बांधकाम 1952 साली करण्यात आले. 16 गुंठे जागा असलेल्या विश्रामगृहाच्या जागेत इमारतीचे जोते 2440 चौ. फूट इतके आहे. सदरची इमारत ही विटांच्या भिंती व कौलारू छपराची आहे. 2013-14 दरम्यान इमारत असलेल्या जागेला संरक्षित भिंतसुद्धा बांधण्यात आली होती.
सन 2016 पर्यत हे सैनिक विश्रामगृह चालू होते. परंतु, आता त्याची अवस्था भूत बंगल्यासारखी झाली असून अतिशय घनदाट जंगल या जागेत निर्माण झाले आहे. आजूबाजूला झालेल्या इमारतीच्या बांधकामावेळी मोठ्या प्रमाणात भरावा करण्यात आला. त्यामुळे विश्रामगृहाच्या जागेत पावसाचे पाणी साचते. त्यामुळे इमारतीच्या भिंतीस कायम ओलावा राहतो. इमारतीचे छप्पर सुद्धा जीर्ण झाले असून मोडकळीस आले आहे. सैनिक विश्रामगृह शेवटची घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे.
माणगाव तालुक्यात जवळपास 200 ते 250 माजी सैनिक आहेत. विश्रामगृह बंद असल्याने त्याना कामानिमित्त आता महाड किंवा अलिबागला जावे लागते. काही माजी सैनिकांनी सत्तरी गाठली असून, त्यांना आता कामानिमित्त प्रवास करणे पाहिल्या सारखे जमत नाही. कोणतीच सुविधा विश्रामगृह बंद असल्याने माजी सैनिकांना माणगावमध्ये मिळत नाही. वीर यशवंतराव घाडगे माजी सैनिक संघटना अध्यक्ष विष्णू सावंत, ऋषीकेश शिंदे यांनी शासन दरबारी वेळोवेळी पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळत नाही.
पाठपुरावा करण्यासाठी या माजी सैनिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. या माजी सैनिकांनी आपले आयुष्य देशाची सेवा करण्यासाठी घालवले त्यांच्यासाठी शासन हे का करू शकत नाही, असा सवालदेखील या माजी सैनिकांनी उपस्थित केला आहे. माजी सैनिकांना योग्य ती सेवा मिळण्यासाठी सैनिक विश्रामगृहाची डागडुजी किंवा नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी वीर यशवंतराव घाडगे माजी सैनिक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यावेळी माजी सैनिक शाम सापळे, स्वप्नील वाघ, सहादेव खैरे, कृष्णा पवार आदी माजी सैनिक उपस्थित होते.