। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड-जंजिरा नगरपरिषदेतर्फे शहरातील मारुती नाक्यावरील समुद्राजवळ लहान मुलांनकरिता खेळण्यासाठी व नागरिकांना विसावा करिता विश्रामधाम बांधले असून या विश्रामधामाची दुरवस्था झाली असून सध्या ही इमारत धोकादायक बनली आहे. यापासुन नागरिकांच्या व मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तरी स्थानिक प्रशासनानी यांची दखल घेऊन ताबडतोब विश्रामधामचा मोडकळीस आलेला भाग लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करित आहेत.
मुरुड शहरात एकमेव बाग असल्याने लहान मुले सकाळ संध्याकाळ खेळण्यासाठी याठिकाणी येत असतात. खेळ खेळत असताना आपला जीव मुठीत घेऊन खेळ खेळावा लागत आहे अशी पालकांची ओरड आहे. रोजच्या रोज विश्रामधाम इमारतीचे प्लास्टर निखळून पडत आहे, गंजलेल्या शिगा बाहेर आल्या आहेत. त्यामुळे या विश्रामधामाची पडझड सुरू झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे व संबंधित खात्याकडे या बाबीकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.