पारंपरिक आणि पर्ससीन मासेमारीतील संघर्ष टोकाला

| रायगड | प्रतिनिधी |

एलईडीद्वारे मासेमारीचे प्रमाण रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक मासेमारी आणि सागरी संपत्तीची लूटमार करणाऱ्या परप्रांतीय एलईडी, पर्ससीन मच्छीमारांमधील संघर्षही टोकाला पोचला आहे. वारंवार तक्रारी करूनही बेकायदा मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने पारंपरिक मच्छीमारांमधून संताप व्यक्त होत आहे.

बंदी असतानाही एलईडी-पर्ससीन नेट मासेमारी जोमात सुरू असल्याने पारंपरिक मच्छीमारांच्या हाती फारसे काही लागत नाही. त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. खोल समुद्रात जाऊन मासळी मिळत नसल्याने डिझेल, रसद आदी खर्चही निघत नसल्याचे मच्छीमार सांगतात. याचाच परिणाम म्हणून तालुक्यातील रेवस आणि बोडणी येथील मच्छीमारांनी आपल्या 300 मासेमारी बोटी महिनाभरापासून किनाऱ्यावरच नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

करंजा बंदरातून सुरू झालेली बेकायदा मासेमारी आता दिघी, आगरदंडा, जीवना बंदरापर्यंत पोचली आहे. यात जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमार भरडला जात आहे. बेकायदा मासेमारी करणाऱ्यांच्या दादागिरीला वैतागून काही पारंपरिक मच्छीमार आपला व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहेत. एलईडी, पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांना पोलिस, राजकीय नेते यांचेही पाठबळ असल्याने त्यांची मनमानी वाढल्याने मारहाणीसारखे प्रकार वारंवार घडत असल्याने पारंपरिक मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बेकायदा मासेमारीमुळे अनेक मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत. काही वर्षांपासून सुरू असलेल्या एलईडी, पर्ससीन मासेमारीमुळे तारली, दाढा, सफेद कोळंबी, नल, तेल बांगडा सारख्या मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत. भविष्यात सुमारे 40 मत्स्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या संदर्भात सरकारने कडक कारवाई करून एलईडी-पर्ससीन नेट मासेमारी पूर्णपणे बंद केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नसेल, असा निर्वाणीचा इशारा पारंपरिक मच्छीमारांनी दिला आहे. सरकारने एलईडी दिव्यांच्या साह्याने मासेमारी करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्याचबरोबर पर्ससीन नेट पद्धतीने मासेमारी करण्यावरही प्रतिबंध आहेत. असे असले तरीही याच पद्धतीने बेसुमार मासेमारी सुरू आहे. वारंवार तक्रारी करूनही जिल्हा प्रशासनाने एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. अधून-मधून कारवाईचा फार्स केला जातो, मात्र कारवाईनंतर तेच मच्छीमार पुन्हा मासेमारी करताना आढळत असल्याचे पारंपरिक मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे.

पूर्वी समुद्रात मोठ्या प्रमाणात मासळी मिळत होती. काही वर्षांपासून सुरू असलेली एलईडी मासेमारी पूर्णतः बंद झाली पाहिजे. सरकारने याबाबत ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. बेसुमार मासेमारीमुळे रोजगार नष्ट होत असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे मच्छीमार बळीराम पेरेकर यांनी सांगितले. मासेमारीबाबत सरकारच्या अध्यादेशालाच हरताळ फासला जात आहे. समुद्रातील मासळीचे प्रमाण घटले असून पारंपरिक मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. जिल्ह्याला 240 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून जवळपास 6,000 बोटी कार्यरत आहेत.

बेकायदा मासेमारीमुळे सागरी जैवविविधतेचा समतोल बिघडत आहे, त्यामुळे काही प्रजाती नष्ट झाल्या असून सरकारने एलईडी मासेमारीवर बंदी घातली आहे. अशा पद्धतीने जे मासेमारी करताना सापडतील, त्यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. दंडही आकारण्यात आला आहे. पारंपरिक मासेमारी करण्यासाठी प्रबोधनही केले जात आहे.

संजय पाटील, सहायक आयुक्त, मत्स्य विभाग, रायगड
Exit mobile version