माथेरानमधून देशाला फुटबॉल खेळाडू मिळतील- आदित्य ठाकरे

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान मध्ये मुंबई फुटबॉल असोसिएशन आणि रायगड फुटबॉल असोसिएशन यांचे फुटबॉल क्लब माथेरान हिल्स फुटबॉल कप मध्ये सहभागी झाले आहेत. मुंबईमधून आलेल्या 22 फुटबॉल क्लब मधील आणि माथेरान मधील स्थानिक फुटबॉल खेळाडू यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण माथेरान मध्ये आलो आहोत. कार्यक्रम किती मोठा आहे यापेक्षा माथेरानच्या लालमाती मधून देशाला फुटबॉलपटू मिळवून देण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे असे प्रतिपादन मुंबई फुटबॉल असोसिशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले. माथेरान हिल्स फुटबॉल कप मध्ये 12,15 आणि 18 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धा होण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा मुख्य वाटा आहे.


माथेरानमध्ये खेळातून पर्यटन आणि पर्यटनातून रोजगार अशी संकल्पना राबविण्याची सूचना ठाकरे यांनी 2017 मध्ये केली होती. त्यानंतर माथेरान मध्ये मुंबई फुटबॉल असोसिएशन यांच्या कडून फुटबॉल खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी माथेरान मधील ओलंपिया रेसकोर्स मैदानाचा कायापालट करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. कोरोना नंतर आता पुन्हा माथेरानमध्ये खेळातून पर्यटन ही संकल्पना राबविली जात असून यावर्षी मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून माथेरान हिल्स फुटबॉल क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या माथेरान हिल्स फुटबॉल कपमध्ये आयोजित करण्यात आली होती. मुंबई फुटबॉल असोसिएशन मधील 22 क्लब मधील खेळाडू यांनी सहभाग घेतला आहे. एक मे पासून 9 मे पासून ओलंपिया रेसकोर्स या हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल या मैदानावर खेळविली जात आहे. 12 वर्षाखालील, 15 वर्षाखालील आणि 18 वर्षाखालील खेळाडू यांचा सहभाग या माथेरान हिल्स फुटबॉल कप मध्ये आहे. या स्पर्धेतील दोन गटातील स्पर्धेचा पारितोषिक समारंभासाठी ठाकरे हे येथे आले होते.

असेम्ब्ली हॉल मध्ये आयोजित केलेल्या समारंभाला ठाकरे यांच्यासह सचिन अहीर, नितीन सावंत, प्रसाद सावंत, अजय सावंत, विवेक चौधरी, प्रथमेश मोरे, कुलदीप जाधव, शकील पटेल, सागर पाटील, परिंदू मोरे, सुषमा जाधव, सोनम दाभेकर, कीर्ती मोरे, ज्योती सोनवले, राजेंद्र शिंदे, नरेश काळे, अजय सावंत, स्वाती कुमार, विजय कदम, बिलाल महापुळे, अनिल गायकवाड, बंडू क्षीरसागर, विनंती घावरे, गिरीश पवार, विजय गंगाराम कदम, हिल्स फुटबॉल स्पर्धेचे रोहित डिसुझा, नानू राऊळ, निमेष मेहता, श्रेयस गायकवाड, सहील बागडे, यांनी नियोजन केले होते. या स्पर्धेत माथेरान हिल्स क्लब ठाणे सिटीएफसी प्रथम तर कळवा युनायटेड दुसरी तर फुटबॉल वर्ल्ड ही टीम तिसर्‍या क्रमांकावर राहिली आहे.

माथेरान मध्ये पुढील पाच वर्षात देश पातळीवरील फुटबॉल स्पर्धा आयोजित होतील 2017 मध्ये केवळ प्रशिक्षण शिबिराची सुरुवात झाली होती, आता तब्बल 22 संघ सहभागी झाले आहेत. ही बाब अत्यंत महत्वाची असून माथेरान मधून देशाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल खेळाडू मिळाले पाहिजेत यासाठी माथेरान हिल्स क्लब ने घेतलेला पुढाकार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी सुरुवात झाली आहे.

आदित्य ठाकरे, शिवसेना नेते

माथेरानचे नाव मोठे करा
जगातील सर्व मोठ्या स्पर्धा या लहान गावातून सुरू झाल्या आहेत हा इतिहास आहे. आणि त्यामुळे माथेरान मधून हिल्स क्लबचे आयोजन हे माथेरानचे नाव देखील असेच मोठे झालेले असेल असा विश्‍वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दुसरीकडे माथेरान मध्ये आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून मैदानाचे सुशोभिकरण केले आहे. या मैदानावर आपल्याला फुटबॉल, क्रिकेट बरोबर पोलो, हॉकी, गोल्फ, हॉलिबॉल सारख्या खेळांना चालना द्यायची आहे. त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत असे आश्‍वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.

Exit mobile version