पंधरवडा भर चालणार फुटबॉलचे सामने
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान मध्ये मुंबई मधील फुटबॉल क्लबचे अनेक खेळाडू वेगवेगळ्या तीन वयोगटात फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. माथेरान हिल्स फुटबॉल कपचे आयोजन माथेरान हिल्स फुटबॉल कप, रायगड जिल्हा फुटबॉल असोसिएशन आणि मुंबई फुटबॉल असोसिएशन यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
1 ते 15 मे या कालावधीत माथेरान मधील ओलंपिय रेसकोर्स म्हणजे हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल येथे मुंबई फुटबॉल असोसिएशन मधील फुटबॉल संघ आणि रायगड जिल्हा फुटबॉल असोसिएशन मधील फुटबॉल संघ यांचा सहभाग या माथेरान हिल्स फुटबॉल कप मध्ये सहभाग आहे. 12 वर्षाखालील, 15 वर्षाखालील आणि 18 वर्षाखालील अशा तीन गटात ही स्पर्धा 15 दिवस चालणार असून खेळातून पर्यटन ही संकल्पना घेवुन प्रसाद भाई सावंत मित्र मंडळाने माथेरान हिल्स फुटबॉल कपचे आयोजन केले आहे.
पहिल्या टप्प्यात मुंबई फुटबॉल असोसिएशन मधील दहा संघ आणि रायगड फुटबॉल असोसिएशन मधील दोन अशा 12 संघांमध्ये तीन दिवस स्पर्धा रंगली आहे. त्यासाठी मुंबई येथून आलेले फुटबॉल खेळाडू आणि त्या खेळाडूंचे पालक तसेच कोच हे 30 एप्रिल पासून माथेरान मध्ये मुक्काम करून आहेत. या माथेरान हिल्स फुटबॉल कप स्पर्धेतील 12 वर्षाखालील खेळाडूंचा अंतिम सामना झाल्यानंतर 15 वर्षाखालील फुटबॉल संघ मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी माथेरान शहरात पोहचणार आहेत. मुंबई मधील विविध फुटबाँल क्लबचे खेळाडूचे प्रशिक्षण सध्या सुरु आहे. त्याच प्रशिक्षणातून मुंबईतील 12 वर्षाखालील फुटबाँल संघाचा अंतिम सामना आज (दि.3) रोजी सायंकाळी झाला. मुंबईतील फुटबाँल क्लब यांच्या पहिल्या टप्प्यातील 12 वर्षा खालील संघाच्या स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी मुंबई फुटबाँल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे येणार होते आणि येथे मुक्काम करून 15 वर्षाखालील माथेरान हिल्स फुटबॉल कपचे उदघाटन करून मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली असल्याने ठाकरे हे मुंबईत थांबणार असून माथेरान येथे येण्याबाबत नवीन तारीख जाहीर करणार आहेत. तर 18 वर्षाखालील फुटबॉल संघ हे दि.7 पासून माथेरानमध्ये पोहचणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेसाठी माथेरानमध्ये या वर्षी किमान 400-500 खेळाडू यांचा सहभाग राहणार आहे.
माथेरान हिल्स स्पोर्ट्स क्लब आणि रायगड फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने तसेच माथेरान गिरीस्थान नगरपरिषद आणि प्रसादभाई सावंत मित्र परिवार यांच्या विशेष सहकार्याने खेळ-खेळातून पर्यटन आणि पर्यटनातून रोजगार ही संकल्पना राबविली जात आहे. 2017 मध्ये मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे माथेरान येथे आले होते. त्यावेळी ठाकरे यांनी फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ऑलंपिया रेसकोर्स मैदानाचे रूप बदलू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर 2019 मध्ये राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील पहिला निधी मंजूर होण्याचे पत्र राज्यसरकारने दिले ते माथेरान मधील ओलंपीया रेसकोर्स मैदानाचे सुशोभीकरण कामासाठी मंजूर केला होता. त्यानंतर त्याचं मैदानाचे नामकरण माथेरान पालिकेने केले असून आता हे मैदान हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल असे नाव देण्यात आले आहे. या मैदानावर पाच कोटी खर्चून प्रेक्षक गॅलरी तसेच संरक्षण भिंतीचे बांधकाम केले जात आहे. पुढच्या कामासाठी विजेची काम आणि मैदाने बनविण्याची कामे केली जाणार आहेत. त्यात फुटबॉल बरोबर हॉकी, कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल यांची मैदाने या क्रीडा संकुलात बनविली जाणार आहेत. गतवर्षी मुंबईत मधील फुटबाँल क्लब यांचे प्रशिक्षण शिबीर सुरु असताना देखील आदित्य ठाकरे यांनी माथेरान येथे भेट देवून पुढील वर्षी माथेरानमध्ये फुटबॉल सामने होतील असे आश्वासन दिले होते. त्यानुसार यावर्षी मुंबई आणि रायगड फुटबॉल असोसिएशन चे 12,15,18 या वयोगटातील खेळाडूंचे सामने सुरू आहेत.
रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील फॉर्टी प्लस क्रिकेटचे दोन सिझन माथेरान मधील हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल मैदानावर झाले आहेत. त्यामुळे आगमी काही वर्षात उन्हाळी सुट्टी मधील मे महिन्यात क्रीडा स्पर्धा यांचे माथेरान हिल्स कप साठी राखीव ठेवले जाणार आहेत. त्यातून पर्यटन वाढण्यास मदत होईल आणि हॉटेल व्यवसाय, अश्वपालक, बाजारपेठ मधील व्यावसायिक यांना व्यवसाय निर्माण होऊ शकतो.
आम्ही माथेरान सारख्या काहीशा दुर्लक्षित असलेल्या पर्यटन स्थळावर वेगवेगळया खेळातील खेळाडू यांना निमंत्रित करावे आणि खेळातून पर्यटन विकसित करावे अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबई मधील फुटबॉल क्लब यांना माथेरान साठी प्रोत्साहित केल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. दूसरीकडे आदित्य ठाकरे हे देशाच्या पश्चिम झोनचे फुटबॉल असोसिएशन चे उपाध्यक्ष असल्याने आता पुढील काळात पश्चिम झोनच्या फुटबॉल स्पर्धा माथेरान मध्ये व्हाव्यात यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
प्रसाद सावंत, आयोजक