शरद पवारांचा फोटो वापरण्यास बंदी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अजित पवार गटाकडून शरद पवारांचं नाव आणि फोटोचा दुरुपयोग केला जात असल्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाकडून लेखी उत्तर मागवलं आहे. पुढील सुनावणीपर्यंत अजित पवार गटानं शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरू नये, असा सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला. त्यासोबत लेखी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत अजित पवार गटावर आरोप लावले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी (दि.18) मार्चला होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि घड्याळ चिन्ह बहाल केलं होतं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूनं निर्णय दिला होता. त्यानंतर या निर्णयाविरोधात शरदचंद्र पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी ( दि.14 मार्च) सुनावणी पार पडली. यावेळी शरद पवार गटानं, अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा करत फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावर आक्षेप नोंदवला. यावर न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरु नका, असे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठावर समोर सुनावणी झाली.