। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड आणि रोहा तालुक्याच्या सीमेवर असणार्या खरबाचीवाडी गावाच्या परिसरात गवताच्या मालाला रविवारी (दि.15) दुपारच्या वेळी वणवा लागला होता. या वणव्याची तीव्रता एवढी होती की बघता बघता हा वणवा खरबाचीवाडी गावात पोहोचला. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तात्काळ येथील रहिवाशांनी रोहा पोलीस ठाण्याशी संपर्क करून वणव्याची माहिती दिली असता त्यांनी अग्निशमन दलाच्या गाडीला घटनास्थळी पाचारण केले. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलासह शेजारील गावातील ग्रामस्थ, रोहा पोलीस कर्मचारी व वनरक्षक यांनी शर्तीचे प्रयत्न केले.
खरबाचीवाडी गावाच्या परिसरातील अचानक एका सुकलेल्या फणसाच्या वृक्षाने पेट घेतला. त्यातली ठिणगी उडून गावाच्या मध्यभागी असणार्या मधुकर कदम यांच्या गोठ्यावर पडली. काही वेळातच त्या गोठ्यातील पेंढ्याने पेट घेऊन आगीने उग्ररूप धारण केले. यावेळी रोहा पोलिस ठाण्याने पाचारण केलेल्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचेपर्यंत ग्रामस्थ आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. त्याचदरम्यान पेट घेतलेल्या गोठ्या शेजारील घरांना आग लागण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी दामिनी कदम हिने प्रसंगावधान दाखवत त्या आग लागलेल्या घरातील गॅस सिलेंडर घरातुन बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक परिश्रमाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. मात्र, या वणव्यात मधुकर कदम यांचा गोठा तसेच त्यातील पेंढी जळून खाक झाली आहेत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.