लग्नासाठी डिजिटल लग्नपत्रिकांची क्रेझ

| रायगड | प्रतिनिधी |

ग्रामीण भागातील नागरिकांवर कळत-नकळत शहरातील जीवनशैलीचा प्रभाव होतो. आधुनिक ऑनलाईन युगात काही गोष्टी वेगाने बदलत आहेत. त्यात धार्मिक कार्यक्रमांसाठी निमंत्रण देण्याच्या पद्धतीचाही समावेश होत आहे. व्हिडीओच्या माध्यमातून आमंत्रण देत डिजिटल लग्नपत्रिका तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आप्तस्वकियांना पाठवली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातही दादा, मामाच्या लग्नांसाठी डिजिटल लग्नपत्रिकांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.

सध्या इंटरनेटचा प्रभाव, धावपळीचे युग आणि महागाईची चपराक यामुळे बऱ्याच पारंपरिक रीतींमध्ये बदल होत आहे. लग्नासाठी निमंत्रण देण्याच्या पत्रिकांचाही ट्रेंडही बदलत चालला आहे. सध्या ऑनलाईन माध्यमातून निमंत्रण देण्याचे प्रमाण वाढले आहे. व्हिडीओ आणि फोटो अशा स्वरूपात डिजिटल पत्रिका तयार करण्यात येत आहेत. आकर्षक अशा डिझाईनमध्ये वर-वधूचे छायाचित्र, तसेच अन्य विविध प्रकारच्या निमंत्रणाचे छायाचित्रांचा समावेश करून डिजिटल पत्रिका तयार केली जाते. सोहळ्यास काही दिवस शिल्लक असताना त्या समाज माध्यमांच्या माध्यमातून नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना पाठवल्या जातात.

वेळ, पैशांची बचत
डिजिटल पत्रिकांमुळे वेळ आणि पैशांची बचत होते. पहिल्यांदा पत्रिकांची निवड करण्यासाठी बाजारात जात त्यांची निवड करून छपाईसाठी हजारो रुपयांचा खर्च येत असे. तसेच, त्यांची छपाईसाठी काही दिवसांचा वेळ वाया जात असे. मात्र, आता ऑनलाईन कामामुळे तत्काळ निमंत्रण पत्रिका तयार करत त्या काही क्षणांतच नातेवाईकांना पाठवता येणे सहज सोपे आणि वेळेच्या बचतीचे झाले आहे.
नातेसंबंधात दुरावा
असे जरी असले, तरी नातेसंबंध दुरावत असल्याची कुजबूज आहे. निमंत्रण देण्याच्या निमित्ताने पूर्वी प्रत्येक जण आप्तस्वकीय, मित्रपरिवार यांची भेट घेत असत. भेट झाल्यानंतर त्यांची खुशाली जाणून घेतली जाई. डिजिटल पत्रिका आल्यापासून घरी भेट होणे दुर्मिळ झाले आहे. त्याचप्रमाणे काही आप्त किंवा मित्रपरिवार समाज माध्यमांवर पत्रिका आली आहे, तर त्यावरच शुभेच्छा देऊन टाकू या, अशी भूमिका घेत असल्याने सोहळ्यांचे आकर्षणही संपुष्टात आले आहे. डिजिटल निमंत्रण प्रक्रियेतील खर्च कमी झाला असला, तरी नातेसंबंध दुरावत आहेत. अल्प प्रमाणात पाहुणे मंडळी सोहळ्यांना उपस्थिती दर्शवत असल्याचे चित्र अनेक वेळा बघावयास मिळत आहे. काही जण मात्र आजही पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत आहे.

स्मार्टफोनमुळे डिजिटल निमंत्रण पत्रिका काही क्षणात पाठविता येतात; तसेच यासाठीचा खर्चही अल्प आहे. सध्या बरेचसे नातेवाईक आधुनिक तंत्रज्ञानात अपडेट झाले आहेत; परंतु काहींना अजूनही घरपोच आमंत्रण देणे महत्त्वाचे वाटते.

मीना पालकर , वधू माता

लग्नसोहळ्यांसह अन्य विविध प्रकारच्या सोहळ्यांसाठी पूर्वी निमंत्रण पत्रिका दिली जात होती. त्यामुळे विविध प्रकारच्या कोऱ्या पत्रिका बाजारात खरेदी-विक्री करून नंतर त्यांची छपाई होत असे. यामुळे पत्रिकाविक्रेता आणि छपाई करणाऱ्यांचे व्यवसाय तेजीत असायचे. डिजिटल पत्रिकांमुळे या दोन्ही व्यवसायांवर परिणाम झाला आहे.

रवींद्र आर्ट, रामराज
Exit mobile version