मुरुड आगाराचे शुक्लकाष्ट संपता संपेना

11 नवीन गाड्या न वापरता पुण्याला रवाना

| मुरुड जंजिरा | सुधीर नाझरे |

मुरुड आगाराच्या स्थापनेला आता दोन दशकांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. पण, सुरुवातीपासून या आगाराच्या मागे लागलेले समस्यांचे शुक्लकाष्ट संपता संपेना असेच म्हणावे लागेल. कधीकाळी रायगडात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या या आगाराला राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षाने अवकळा आलेली आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना नेहमीच गंजलेल्या लालपरीमधूनच प्रवास करावा लागत आहे.

मुरुड आगारात 20 वर्षे एकही नवी गाडी न मिळणे म्हणजे राजकीय अपयश आहे. रस्ते अतिशय खराब असल्याने जुन्या गाड्यांतून नागरिकांना प्रवास करणे म्हणजे एक प्रकारचे मरण यातनाच आहेत. विद्यमान सरकारने मुरुडकरांवर दया दाखून 11 नवीन बस आल्या; परंतु मुरूडकरांच्या नशिबी त्या नव्या एसटीमधून प्रवास करण्याचा योगच नव्हता. त्या बस न वापरता पुण्याकडे रवाना करण्यात आल्या. कारण काय, तर मुरुड-साळाव पूल नादुरुस्त म्हणून.

साळाव पूल नादुरुस्त असल्याने त्यावरून 12 टनापेक्षा जास्त वजनाच्या बस जाण्यास बंदी आहे. मुरुडला आलेल्या बस 14 टनांच्या आहेत. रेवदंडा रस्त्यावरून या बस वळवताना अडचण येते, अशा तक्रारी वाहक, चालकाच्या आहेत. या कारणामुळे आगाराने बस पुणे डेपोला पाठवल्या. ही कारणे माहिती होती तर मुरुडला गाड्या देताना कमी वजनाच्या व कमी लांबीच्या का दिल्या नाहीत, हा प्रश्न नागरिकांना आहे. त्याबदल्यात 10 वातानुकूलित मिनीबस, साधी बस सुरु कराव्यात, अशी मागणी प्रवाशांची आहे.

2007 साली मुरुड आगारप्रमुख पंकज ठोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात प्रथम आला होता. महाराष्ट्रातून डेपोचे कौतुक करण्यात आले होते. पण आज डेपोची दुर्दशा आहे. डेपोतील चालक, वाहक यांची चार वर्ष भरती नसल्याने आज 90 चालक, वाहक कमी आहेत. असलेल्या चालकांवर कामाचा अति भार येत आहे, त्यामुळे गाड्या वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांची कुचंबना होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

हे होणे आवश्यक
1) मुरुड डेपोचे काँक्रिटीकरण गेली तीन वर्षे अर्धवट आहे. दर पावसाळ्यात परिसरात मोठे खड्डे पडतात, त्यामुळे गाड्या चालवणे कठीण होते. प्रवाशांना चालणेदेखील कठीण होते.
2) डेपोत आसन निवाऱ्यात प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोया असणे गरजेचे आहे.
3) मुरुड रहिवाशांना मुरुड डेपोतून कोणतेही पार्सल पाठवता येत नाही, अशी सुविधा डेपोत नाही.
4) मुरुड डेपोची जागा एकरात असल्याने सध्या डेपोसाठी वापरण्यात येणारी जागा ही 30 टक्के आहे. त्यामुळे उरलेल्या 70 टक्के जागेचा वापर व्यवसाय करण्यात यावा, अशी प्रवासी संघटनांची मागणी आहे.

मुरुडच्या पर्यटन विकासासाठी ज्याप्रमाणे चांगले हवेत, त्याचप्रमाणे वाहतुकीची व्यवस्था चांगली असणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाने मुरुडसाठी खास छोट्या वातानुकूलित मिनी बस देण्याचं नियोजन करण्याची गरज आहे. जर मुंबई, पुणे येथून वातानुकूलित बस थेट मुरुडसाठी सुरु झाल्या, तर मुरुडचा पर्यटन विकास खऱ्या अर्थाने होईल.

हितेंद्र पंड्या, प्रवासी
Exit mobile version