विहिरीत सापडले फुटके मडके, हाडे, मांस आणि उर्दू भाषेतील पुस्तक
। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या ममदापूर ग्रामपंचायत येथे एका विहिरीत फुटके मडके, हाडे, मांस आणि उर्दू भाषेतील पुस्तक सापडून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर, कोणी अघोरी विद्या तर केली नाही ना, असा ग्रामस्थांचा संशयदेखील बळावला आहे. याबाबत आता नेरळ पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील ममदापुर ग्रामपंचायत येथे गावाबाहेर पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या विहिरत दि. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास एक बुरखा घालून आलेल्या महिलेने भरलेली बॅग ही विहिरीत टाकून दिली. आणि, ती महिला घाई गडबडीतच तिथून पळ काढत एका मोटारसायकलवरून गेली. याबाबत ग्रामस्थांनी नेरळ पोलिसांना याबाबत माहिती दिली होती.
यावेळी विहिरीत टाकण्यात आलेल्या बॅगेला विहिरीतील पाणी खाली करून बाहेर काढण्यात आले. त्यावेळी खूप दुर्गंधी सुटली होती तर, यात उर्दू भाषेत लिहिलेले एक फुटके मडके, त्याचबरोबर एक तीन सुळ्यासारखे एकत्र हाड व मांस, त्याचबरोबर उर्दू भाषेतील पुस्तक सापडून आले आहे. एक धक्कादायक म्हणजे, यात एका चिठ्ठीवर लहान मुलाच्या आकाराचे चित्र दिसत असून, उर्दू भाषेत लिहिलेलं आहे. एकूणच गावात ही पहिलीच घटना समोर आल्याने शहरात एकाच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.