तरुणीचा बळी घेणारा मोकाटच!

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील लोणेरेमध्ये एका तरुणीवर अत्याचार करून तिचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना घडून तीन दिवस उलटून गेले तरी मारेकरी मोकाटच आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यात नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. मारेकऱ्याला तात्काळ अटक करण्यासाठी माणगावमध्ये बंद पाळण्याच्या पावित्र्यात नागरिक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिस मोहम्मद खान मालदार असे या आरोपीचे नाव आहे. मयत तरुणी ही माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात एका गरीब कुटुंबातील होती. लोणेरे येथील ओमकार लॉजमधील कामगार सोमवारी (दि. 20) सकाळी खोली साफ करण्यासाठी आला. त्यावेळी त्या खोलीमध्ये तिचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीची ओळख पटवून घेतल्यावर तिच्यासोबत कोण होता, याचा तपास सुरु केला. अनिस मोहम्मद खान मालदार याने या लॉजमधील खोलीमध्ये रविवारी (दि.19) ते सोमवारी (दि.20) दरम्यान तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर हात व पाय रस्सीने बांधून तिच्या डोक्यात व हाताच्या मनगटावर कोयत्याने वार करून ठार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. मारेकऱ्याला तात्काळ अटक करा, ही भूमिका नागरिकांनी घेतली. या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह स्थानिक पोलिसांच्या मदतीने मारेकऱ्याचा शोध सुरु आहे. यासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र, घटना घडून तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप मारेकरी सापडलेला नाही. त्यामुळे माणगावमध्ये बंद पाळण्याच्या पावित्र्यात नागरिक आहेत. मालदार याने काही वर्षांपूर्वी स्वतःच्या मुलीलादेखील आपटून ठार केल्याची चर्चा माणगावमध्ये सुरु आहे. त्यामुळे पोलीस काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version