देवधामापूरातील बंधारा गाळमय

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
संगमेश्‍वर तालुक्यातील धामापूर सप्रे वाडीत सात लाख रुपये खर्चून बंधारा उभारण्यात आला होता. सद्यःस्थितीत हा बंधारा गाळाने भरला असल्याने यात पाण्याचे संकलन होत नसून, गाळमय हा बंधारा मुळचा उद्देश हरवून बसला असल्याची स्थिती आहे.
कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. असे असले तरीही रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाई जाणवू लागते. याबाबत शासनस्तरावर अनेक प्रयत्न करुन पाणी योजनांसाठी निधी मंजूर केला जातो. मात्र, या निधीचे योग्य नियोजन केले जात नसल्याने पाणी अडवून उभारलेले बंधारे थंडींच्या हंगामापासून कोरडे पडतात.
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून ग्रामपंचायतीमार्फत गावातील ओढ्यांवर आवश्यक ठिकाणी बंधारे बांधण्याची मोहिम हाती घेतली जाते. मात्र, यातील बहुतेक बंधारे हे काही कालावधीतच निरुपयोगी ठरतात. बंधारा दिसत असला तरीही त्यात थेंबभरही पाणी नाही, अशी स्थिती दिसून येते.
अमूकतमूक काळात परिसरात किती बंधारे बांधून झाले, या आकडेवारीवरच मोठे समाधान मानले जाते. गेल्या अनेक वर्षात या स्थितीत बदल झालेला नाही. परिणामी फेब्रुवारी महिन्यापासून परत पाणी टंचाई असलेल्या गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यावर भर दिला जातो.सात वर्षांपूर्वी शासनाच्या पाणलोट विभागाने प्रत्येक गावात पक्के बंधारे उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र, दर्जाहीन बांधकाम, चुकीचे नियोजन, पाणी अडविण्याबाबतची अनास्था, परस्परातील वाद यासारख्या असंख्य कारणांमुळे काही गावात निकृष्ट बांधकामांमुळे हे बंधारेच जागेवर नाहीत.
संगमेश्‍वर तालुक्यातील धामापूर सप्रे वाडीत असाच एक बंधारा सात लाख रुपये खर्चून उभारण्यात आला असला तरी या बंधार्‍याची अवस्था अशीच आहे. यामुळे किमान आतातरी या प्रश्‍नाकडे आस्थापनेकडून लक्ष देण्यात येईल का, असा प्रश्‍न स्थानिकांकडून करण्यात आला आहे.

Exit mobile version