अखेर ‘उमटे’चे भगदाड बुजवले

जि.प. सेस फंडातून दुरुस्तीचे काम

। अलिबाग । प्रतिनिधी ।

साठ हजारांहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा करणार्‍या उमटे धरणाला भगदाड पडले होते. यामुळे ऐन पावसाळ्यात आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु, याविरोधात आवाज उठवताच प्रशासनास जाग आली. अखेर या धरणाची डागडुजी करण्यास जिल्हा परिषद प्रशासनाला यश आले आहे. जिल्हा परिषद सेस फंडातून त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या धरणाच्या गाळाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, सीएफटीआयच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, मोठ्या प्रमाणात धरणातून गाळ काढण्यात आला आहे.

उमटे धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. त्यानंतर 1995 साली हे धरण जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरीत झाले. धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट आहे. पाण्याची शेवटची पातळी 40 मीटर, धरणाची उंची 56.40 मीटर आहे. धरणाच्या पाण्यावर 47 गावे व 33 आदिवासीवाड्या अवलंबून आहेत. धरण तब्बल 41 वर्षे जुने आहे. निधीअभावी धरणातील गाळ काढण्यास जिल्हा परिषद प्रशासन उदासीन ठरले होते. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात पाण्याच प्रश्‍न निर्माण झाला होता. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व शेकाप महिला आघाडी प्रमुख तथा सीएफटीआयच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत धरणातील गाळ काढण्याची तयारी दर्शविली. त्यांच्या प्रयत्नाने धरणातील काही गाळ काढण्यात यश आले. धरणाची दुरुस्ती करण्याबाबतदेखील त्यांनी पाठपुरावा प्रशासनाकडे केला होता. जुन्या असलेल्या धरणाच्या बाह्य बाजूकडील भिंतीचे दगड मोठ्या संख्येने निखळले होते. त्यामुळे भिंतीला भले मोठे भगदाड पडले होते. उमटे धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. राकेश पाटील यांनीदेखील याबाबत निवेदन दिले होते. धरणाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी 21 जून रोजी उमटे धरणाला भेट दिली. भगदाड पडलेल्या भिंतीची पाहणी केली. भिंतीला पडलेल्या भगदाडाची तातडीने डागडुजी करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देत डागडुजीसाठी आवश्यक निधी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगडादाची डागडुजी करण्यात आली आहे.

उमटे धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडाची डागडुजी करण्यात आल्याने परिसरातील गावांना दिलासा मिळणार असून, धरणावर अवलंबून असणार्‍या गावांना सुलभरित्या पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. डागडुजीचे काम जिल्हा मृद् व जलसंधारण अधिकारी अण्णासाहेब कदम, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सुधीर वेगुर्लेकर, निहाल चवरकर यांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आले आहे.

Exit mobile version