दस्तुरी नाका परिसर केला चकाचक
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या पर्यटन स्थळाची सर्व व्यवस्था माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेकडून केली जाते. मात्र, या पर्यटनस्थळी येण्यासाठी असलेले एकमेव प्रवेशद्वार हे अस्वच्छतेचे गर्तेत सापडले होते. याबाबतची दखल घेत ‘कृषीवल’ने मंगळवारी (दि.15) ‘माथेरानच्या प्रवेशद्वारावरच कचर्याचे ढीग’ अश मथळ्याची बातमी प्रकाशीत केली होती. यामुळे माथेरान परिषद खडबडून जागी झाली असून विशेष स्वच्छता मोहीम राबवून दस्तूरी नाका हा परिसर स्वच्छ केला आहे.
माथेरान येथे पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांसाठी वर्षाकाठी तब्बल 12 लाखाहून अधिक पर्यटक येत असतात. माथेरान शहरात येण्यासाठी सध्या दस्तुरी नाका हे एकमेव ठिकाण असून पर्यटकांना प्रवासी टॅक्सी आणि खासगी वाहने घेऊन आल्यावर दस्तूरी येथे उतरून पुढे माथेरान शहरात जावे लागते. या दस्तूरी नाका परिसराला माथेरान नगर परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे अस्वच्छतेचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक महिने पडून राहिलेल्या कचरा कुजून जाण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच, येथील अस्वच्छता बघून नगर परिषदेला दूषणे देत होते.
तसेच, माथेरान नगर परिषदेकडून नेमण्यात आलेल्या तिन्ही कर्मचार्यांकडून मुख्य रस्ता वगळता अन्य कोणत्याही भागात स्वच्छता केली जात नव्हती. याबाबत ‘कृषीवल’ने प्रकाशीत केलेल्या ‘माथेरानच्या प्रवेशद्वारावरच कचर्याचे ढीग’ या बातमीमुळे खडबडून जाग आलेल्या माथेरान परिषदेने स्वच्छता मोहीम राबविली. परिषदेच्या स्वच्छता पथकाने ही मोहीम राबविताना सर्व स्वच्छता कर्मचारी यांच्या साहाय्याने दस्तूरी नाका परिसरातील रुग्णवाहिका मार्ग, वाहनतळ तसेच एमटीडीसी परिसरातील रस्त्यांच्या आजूबाजूला साठून राहिलेल्या कचर्याची विल्हेवाट लावली. यात प्रामुख्याने वाहनतळ भागात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करणारे साहित्य पडून राहिले असल्याने या परिसराला बकाल रूप आले होते.
यावेळी माथेरान नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक नरेंद्र सावंत यांनी या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी नेमणूक असलेले तीन कर्मचारी काय काम करतात, यासाठी येथे बसविण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेरांचा आधार घेतला जाईल, अशी माहिती या स्वच्छता मोहिमेनंतर त्यांनी दिली.