भराडी देवीचा कौल मिळाला; आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली

| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |

महाराष्ट्रात आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या जत्रेला एक विशेष स्थान आहे. या यात्रेचे वैशिष्ठ म्हणजे दरवर्षी देवीला कौल लावून या यात्रेची तारीख ठरवली जाते. त्यामुळे यंदा ही यात्रा कोणत्या तारखेला येणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर बुधवारी (03) सकाळीच भराडी देवीने कौल दिल्यानंतर आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने जत्रेची तारीख निश्चित केली आहे. त्यानुसार आंगणेवाडीच्या जत्रेला पुढील वर्षी 9 फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 3 ते 5 डिसेंबरदरम्यान मंदिर परिसर बंद ठेवण्यात येणार आहे.

आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख कुठच्या तिथी अथवा वारानुसार ठरलेली नाही. तर देवीचा कौल घेऊन जत्रेची तारीख ठरवली जाते. यात्रा दीड ते दोन दिवस चालते. पण या जत्रेची लगबग देवदिवाळीपासून सुरू होते. देवदिवाळीच्या दुसऱ्या दिवशी डाळप (डाळमांजरी) होते. तिसऱ्या दिवशी प्रमुख आंगणे मानकरी देवळात जमतात. ते मानकरी वंशपरंपरागत असले तरी दरवर्षी चार नवीन मानकरी निवडले जातात. मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. “शिकारेक संपूर्ण गाव जमतोलो, शिकार करुक तू हुकुम दे, शिकार साध्य करून दी” असे गाऱ्हाणे घालून कौल लावला जातो. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला, की यात्रेची तारीख ठरवली जाते. दरवर्षी सुमारे 7 ते 8 लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात.

अशी आहे परंपरा
मसुरे गाव येथील भराडावर म्हणजेच माळरानावर देवी साक्षात प्रकट झाल्याचे मानले जाते. त्यामुळे या देवीला भराडी देवी हे नाव पडलेले आहे. कोकणातील भाविकांची देवीवर श्रद्धा आहे, आंगणे कुटुंबीयांचे मंदिर असले तरी ते आता संपूर्ण कोकणाचे झाले आहे. भाविक येथे नवस बोलतात, तो पूर्ण होत असल्याची त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे आंगणेवाडीची यात्रा आता कोकणवासीयांची जत्रा झाली आहे.
धार्मिक महत्त्वासोबतच रंगतो सांस्कृतिक सोहळा
धार्मिक महत्त्वासोबतच आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेमध्ये सांस्कृतिक सोहळा देखील रंगतो. आंगणे ग्रामस्थ एक नाटक करतात त्याला मांडावरचं नाटक म्हणतात. मिरजेहून गोंधळी येतात ते देवीसमोर गोंधळ मांडतात. दशावतार असतो. मुंबईतील चाकरमानीही या यात्रेसाठी नित्यनेमाने येत असतात. तर अनेक राजकारणी मंडळीही भराडी देवीच्या दर्शनाला येतात.
Exit mobile version