। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून, या वाडीत ‘भराडी देवी’चे मंदिर आहे. आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख कोणत्याही तिथीवर ठरत नसून देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. त्यानुसार आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून दरवर्षीप्रमाणे राज्यभरातून हजारो भाविक आंगणेवाडीत दाखल झाले आहेत.
यात्रोत्सवाच्या निमित्ताने सुवर्ण अलंकाराने भरजरी साडी नेसवून मातेला सजविण्यात आले आहे. यात्रोत्सवानिमित्त देवालयाच्या परिसरात दर्शन रांगांची व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून संपूर्ण मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. नवसाला पावणार्या व भवानीचे रूप असलेल्या भराडीमातेच्या दर्शनासाठी विविध पक्षांचे आमदार, खासदार, महापौर येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेले अनेक दिवस सुरु असलेली तयारी आंगणेवाडी कुटुंबीय, जिल्हा प्रशासन यांनी पूर्ण केली आहे. भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यांनी आंगणेवाडी व परिसर गजबजून गेला आहे. देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी दहा रांगांमधून व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, सर्व भाविकांनी संयम व शिस्त बाळगून देवीचे दर्शन रांगेतूनच घेण्याचे आवाहन आंगणेवाडीचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले आहे.
शनिवार 22 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजल्यापासून यात्रेला सुरुवात झाली असून रविवार 23 फेब्रुवारीपर्यंत यात्रोत्सव (दोन दिवस) चालणार आहे.