रेवदंडा-साळाव पूल धोक्यात
| रेवदंडा | वार्ताहर |
कुंडलिका समुद्र खाडीत मालवाहतूक बार्जची रेलचेल मोठ्या प्रमाणात होत असून, मालवाहतूक बार्जच्या वाहतुकीने रेवदंडा-साळाव पुलास बार्जच्या घर्षणाने व धक्क्याने धोका निर्माण होत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
रोहा तालुक्यातील सानेगाव येथील प्रायव्हेट कंपनीद्वारेकुंडलिका समुद्र खाडीमार्गे कच्चा कोळसा मालवाहतूक बार्जद्वारे उतरविला जातो. सदर मालवाहतूक बार्ज रेवदंडा-साळाव पुलाच्या खालून दिवस व रात्रीचे ये-जा करत असतात. साळाव-रेवदंडा पुलाचे दोन बिममधून हे मालवाहतूक बार्ज मार्गक्रमण करत असतात, परंतु दोन बिममधील अंतरामधून मालवाहतूक जा-ये करत असताना पुलाचे बिमला मालवाहतुक बार्ज कित्येकदा घर्षण करतात, अथवा बार्जच्या धक्का लागतो, असे प्रत्यक्षदर्शी स्थानिकांचे म्हणणे असून, त्यामुळे रेवदंडा-साळाव पुलास धोका निर्माण झाला आहे. नित्याने अशा प्रकारचे मालवाहतूक बार्जचे पुलास होत असलेले घर्षण अथवा धक्का यामुळे साळाव-रेवदंडा पुलास हानी पोहोचत आहे. परिणामी, मालवाहतूक बार्जने साळाव-रेवदंडा पुलास धोका संभवतोय. साळाव-रेवदंडा पुलाचा संभाव्य धोका मालवाहतूक बार्जच्या घर्षणाने अथवा धक्क्याने होत असल्याने येथून होत असलेली मालवाहतूक बार्जची वाहतूक त्वरित थांबवावी, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
याबाबत बंदर निरीक्षक सतीश देशमुख यांच्याशी संवाद साधला असता, अद्यापि असा प्रकार घडत असल्याचे दिसून आले नाही, असे सांगितले. मात्र, रेवदंडा-साळाव पुलास मालवाहतूक बार्जचे घर्षण होते, अथवा धक्का बसतो असे अनेक प्रत्यक्षदर्शीनी हा प्रकार अनुभवला असल्याचे सांगण्यात येते.