| रसायनी | वार्ताहर |
माझी वसुंधरा अभियान 6.0 चे टूलकिट तयार करण्याकरिता, माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्कृष्ट काम करणारे खालापूर गटविकास अधिकारी (प्रथम श्रेणी) संदीप कराड यांची कोकण विभागातून निवड करण्यात आली आहे.
माझी वसुंधरा अभियान 5.0 हे 31 मार्च 2025 रोजी संपत असून, माझी वसुंधरा अभियान 6.0 हे 1 एप्रिल 2025 रोजी सुरू होत आहे. माझी वसुंधरा अभियान संचनालय सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाकरिता लागू होताना व्यवहार्य असणारी व अंमलबजावणी करण्यास योग्य या उद्देशाकरिता अधिकारी, कर्मचारी, तज्ज्ञ यांचे मत जाणून घेण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. कोकण विभागात उत्कृष्ट काम करणारे गटविकास अधिकारी म्हणून खालापूरचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांची निवड करण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियान 1.0 पासून संदीप कराड सक्रिय असून, राज्य स्तरावर त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. तसेच त्या त्या पंचायत समिती व त्या अंतर्गत येणार्या ग्राम पंचायत यांना पारितोषिक मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत तांबाटी, ग्रामपंचायत वडगाव, ग्रामपंचायत साजगाव यांनी पारितोषिक जिंकले आहे. गटविकास अधिकारी संदीप कराड यांचे अभिनंदन होत आहे. तसेच कोकण विभाग स्थरावर उत्कृष काम करणारे ग्राम पंचायत अधिकारी म्हणून तांबाटी ग्रामपंचायतीचे अधिकारी प्रशांत कदम यांची निवड करण्यात आली आहे. एकाच तालुक्यातून दोन अधिकारी यांची निवड झाल्याने खालापूर तालुक्यातील माझी वसुंधरा अभियान 6.0 पुन्हा यशस्वी होईल याची खात्री पटली आहे.