अधिकार्यांचा भ्रष्टाचार प्रवाशांच्या मुळावर
। उरण । वार्ताहर ।
उरणमधील जेएनपीए बंदर-नवी मुंबई महामार्गावर नव्यानेच बांधण्यात आलेल्या करळ रेल्वे क्रॉसिंग येथील उड्डाण पुलाच्या भिंतीला तडा गेला आहे. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. भविष्यात अपघात झाल्यास त्याचा वाहनांबरोबरच नागरीकांना बसण्याची शक्यता आहे. तरी या पार्श्वभूमीवर येथील खासदार व आमदारांनी लक्ष घालण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
उरण तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकास होत असल्याने या परिसरातील वाहनांची रेलचेल सुरक्षित व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या देखरेखीखाली जेएनपीए बंदर व सिडको व्यवस्थापनाने नँशनल हवे अँथरिटी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तालुक्यात अनेक उड्डाण पूलाची कामे केली आहेत. परंतु, भ्रष्ट अधिकार्यांमुळे फुंडे, जासई ग्रामपंचायत हद्दीतील पुल, पुलाचा गर्डर (खांब) पडून दुचाकीस्वार तसेच कामगारांना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच, चिर्ले-धुतूम खाडीकिनार्यावरील पुल पडून मासेमारीसाठी गेलेल्या 4 आदिवासी बांधवांनादेखील जीव गमवावा लागला होता. त्यातच पागोटे येथील उड्डाण पूलाचे बांधकाम व रस्ता खचल्याची घटना समोर आली होती. त्यावेळी पोलीसांच्या सतर्कतेमुळे रात्रीच्या अंधारात होणारी मोठी दुर्घटना टळली होती. भ्रष्ट कारभारामुळे तालुक्यातील पुलांची ही अवस्था असेल तर नव्याने उभारण्यात येत असलेला उड्डाणपुल खरेच धोकाविरहित ठरतील का, असा प्रश्नही उरण सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
जेएनपीए बंदर, सिडको, नँशनल हवे अँथरिटी व सार्वजनिक बांधकाम विभाग व्यवस्थापनाच्या भ्रष्ट कारभारामुळे तालुक्यातील अनेक उड्डाण पुलांची दयनीय अवस्था झाली आहे. तसेच, लोकप्रतिनिधींकडूनदेखील जाणूनबुजून याकडे दुर्लक्षित होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चर ऑडिड करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु, संबंधित अधिकारी वर्गाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने करळ रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेल्या उड्डाण पूलाच्या बांधकामांना तडे गेल्याची बाब समोर येत आहे.