बोर्लीपंचतन येथे मुलीने दिला पित्यास अग्नी

स्त्री-पुरुष समानतेचा नवा आयाम
| बोर्लीपंचतन । मकरंद जाधव |
आजच्या युगात मुलगा व मुलगी यांमध्ये कोणताही भेदभाव करु नये हा सामाजिक संदेश देणारी घटना श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे घडली आहे. जन्मदात्या पित्याच्या मृत्यूनंतर मुलीने अग्नी देत समाजाला वेगळी दिशा देण्याबरोबरच स्त्री-पुरुष समानतेचा नवा आयाम दिला आहे. बोर्लीपंचतन येथील सुरेश महादेव परकर यांचे बुधवार, दि.19 जानेवारी रोजी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. गेली काही वर्षे ते स्मृतीभ्रंशाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना पाच मुली आहेत. पाचही मुली उच्च शिक्षित व विवाहित असून, त्या वेगवेगळ्या शासकीय पदावर कार्यरत आहेत. पित्याच्या मृत्युनंतर त्यांचे अत्यसंस्कार मुलाच्या हातून केले जातात; परंतु सुरेश परकर यांना मुलगा नसल्याने त्यांच्या पाचही मुली आपल्या जन्मदात्याच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानात हजर राहिल्या. त्यांची द्वितीय कन्या सुचिता पवार हिने धाडसाने आपल्या पित्याला अग्नी दिला.


प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तबगारीने आपल्या कार्याचा ठसा उमटवत असल्या तरी आजही काही रुढी परंपरा समाजात तशाच टिकून असल्याचे दिसते. मात्र, या सावित्रीच्या लेकींनी ही चौकट ओलांडून आपल्या कार्याने समाजासमोर स्री-पुरुष समानतेचा संदेश दिला आहे. परकर कुटुंबाने उचलले हे पाऊल समाजाला एक वेगळी दिशा देणारे आहे. याप्रसंगी त्यांचे जावई, नातेवाईक, मित्र परिवार, बोर्लीपंचतन येथील मान्यवर तसेच भंडारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश परकर यांच्या पश्‍वात पत्नी, पाच मुली, जावई व नातवंडे असा मोठा परीवार आहे.

Exit mobile version