महामार्गाची डेडलाइन पुन्हा हुकणार!

कोलाड ते नागोठणेदरम्यान काम संथ गतीने, नवीन बांधकामाला तडे, महिसदरा नदीवरील नवीन पुलाचे काम बाकी

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंदापूर येथील सभेत मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील चौपदरी करणाचे काम 2018 ला पूर्ण होईल असे सांगितले होते. नंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक लाईन पूर्ण होईल व डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे सांगितले होते. परंतु, महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. फक्त तारीख पे तारीख अशीच परिस्थिती पहावयास मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी महामार्गावर जागोजागी लावण्यात आलेल्या फलकावर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 कासू ते इंदापूर कि.मी.42/00ते 84/00 या लांबीतील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम मे. कल्याण टोळवेज प्रा.लि. या कंपनीला दिलेले असून, हे काम जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे अपेक्षित होते. तथापि, उपरोक्त कंपनीच्या नियोजनाअभावी या कामाला विलंब होत आहे. तरी हे काम मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासित केल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.

कोलाड ते नागोठणेदरम्यानचे महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असून, या महामार्गावरील सुकेळी खिंडीतील तयार करण्यात आलेल्या नवीन बांधकामाला पाणी न मारल्यामुळे पंधरा-पंधरा मीटरवर या रस्त्याला जागोजागी तडे गेले आहेत. हे गेलेले तडे हे केमिकलमिश्रित सिमेंटने भरले गेले असून यामुळे हा रस्ता किती दिवस तग धरू शकेल हे सांगता येत नाही. शिवाय, या मार्गावरील पुई येथील महिसदरा नदीवरील पुलाचे काम नुकतेच सुरु केले असून, चार दिवस बंद व चार दिवस सुरु आहे. यामुळे या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी किती महिने लागतील, हे ही सांगता येत नाही.

Exit mobile version