महामार्गाचे काम कधी होणार?, नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
। कोलाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील आंबेवाडी (कोलाड) बाजारपेठेतील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ही धूळ आजूबाजूला पसरत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. त्यामुळे या धुळीला पर्याय म्हणून रस्त्याला पाण्याची फवारणी केली जात आहे. यात हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाणी घालविण्यापेक्षा महामार्गाचे काम कधी होणार, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी, नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अठरा वर्षांपासून सुरु आहे. या महामार्गांवरील आंबेवाडी बाजारपेठेतील ब्रिज ,रस्ता, गटारे यांची कामे अपूर्ण स्थितीत आहेत. याचा नाहक त्रास येथील नागरिकांना भोगावा लागत आहे. पावसाला ऋतू संपला असूनही चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. याउलट पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आलेली चिखलमिश्रित खडीचे ऑक्टोबर हिटच्या उन्हामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामासाठी बाजारपेठा उध्वस्त करण्यात आल्या. अनेकांना आपल्या व्यावसायावर पाणी सोडावे लागले. तसेच दुकानदारांना कोणतीही सवड न देता त्यांच्या दुकानावर बुलडोजर लावून पाडण्यात आले. परंतु, याला आठरा वर्षे पूर्ण होऊन गेली तरी चौपदरी करणाचे काम अपूर्ण स्थितीत आहे. लोकनेत्यांकडून कित्येकवेळा महामार्गाची पाहणी करण्यात आली. अनेकवेळा रस्ता पूर्ण होण्याच्या डेडलाईन देण्यात आल्या, तरी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.
रस्त्याला पाण्याची फवारणी करून वेळ व शासनाच्या तिजोरीतील पैसा वाया घालविण्यापेक्षा रस्त्याचे काम सुरु करून यावर्षी तरी पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.







