मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार

| मुंबई | प्रतिनिधी |
राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेली मुदत उद्या संपत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाने आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. येत्या दोन दिवसात सरकारने आरक्षणावर भूमिका जाहीर करावी. नाही तर महाराष्ट्रातून लाँग मार्च निघेल आणि हा लाँगमार्च मुंबईला येऊन धडकेल. आमचा हा विराट लाँगमार्च सरकारला झेपणार नाही, असा इशाराच मराठा मोर्चाने दिला आहे.

सत्ताधारी आणि विरोधक एकाच माळेचे मणी आहेत. आमचा छळ थांबवा. राज्यातील वातावरण कुणालाही पोषक नाही. आमचा अंत पाहू नका, असं कळकळीचं आवाहनही मराठा मोर्चाने केलं आहे.

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी नव्हती. आमच्या डोक्यातही तो विचार आला नव्हता. राज्य सरकारनेच ते सांगितलं होतं, असा धक्कादायक खुलासाही यावेळी करण्यात आला. तसेच कुणबी जात प्रमाणपत्राची याचिका कोर्टाने फेटाळलीय. सरकारने त्यावर खुलासा करावा, अशी मागणीही मराठा मोर्चाने केली आहे.

गेल्या 6 मे 2023 पासून मराठा वनवास यात्रेतून आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पायी चालत आहोत. 31 दिवस पायी चालत आहोत. आम्हाला ओबीसीतून 50 टक्क्याच्या आत आरक्षण देण्याची मागणी आहे. आम्ही शरद पवार यांच्या घरावर खंजीर आंदोलन केलं तेव्हापासून आमची मागणी आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

Exit mobile version