एका उद्दामाचा मृत्यू

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसींजर यांचे शंभराव्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. किसींजर किती धुरंधर मुत्सदी होते आणि जगाच्या राजकारणात त्यांनी कशी मोलाची भूमिका बजावली हे सध्या सांगितले जात आहे. पण किसींजर हे पक्के भारतद्वेष्टे होते. भारताला खच्ची करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. कम्युनिस्ट व डाव्या विचारांचेही ते वैरी होते. आपली सर्व बुध्दी व शक्ती त्यांनी हा विचार नष्ट करण्यासाठी खर्ची केली. त्यामुळेच त्यांच्या निधनाच्या निमित्ताने त्यांची दखल घेणे आवश्यक आहे. किसींजर हे अमेरिकी परराष्ट्र धोरणातील मोठे प्रस्थ होते. 1969 ते 1977 या काळात ते परराष्ट्रमंत्री होते व काही काळ अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही झाले. हा सर्व शीतयुध्दाचा काळ होता. रशिया एकसंध होता. कम्युनिस्ट किंवा डाव्या विचाराचा जगभरात प्रसार व्हावा यासाठी प्रयत्नशील होता. हा विचार अमेरिकेला व तेथील भांडवलशाहीला संपवून टाकेल अशी भीती तेथील समाजामध्ये पद्धतशीरपणे लहानपणापणापासून रुजवली जाते. हे दुसऱ्या महायुध्दाच्या काळापासून चालू होते. कम्युनिस्ट ही शिवी ठरवण्यात आली होती. कम्युनिझम आणि रशियाला नष्ट करणे हे जणू पुण्यकर्म आहे हे सर्वांच्या मनावर ठसवले जाते. हॉलिवूडच्या सिनेमांमध्ये अगदी आजतागायत खलनायकांना कम्युनिस्ट दाखवले जाते. किसींजर हे या द्वेष्ट्यांचे मुकुटमणी होते. शिवाय त्यांच्या हाती सत्ता होती. अमेरिकी अध्यक्षांना सल्ला देण्याची व ते त्याप्रमाणे वागतील हे पाहण्याची ताकद होती. दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमध्ये डावा विचार मानणाऱ्यांच्या राजवटी आल्या होत्या. चिलीमधील आयेंदे यांचे सरकार हे त्यापैकीच एक. त्यांनी देशातील उद्योगांचे राष्ट्रीयकरण करण्याचे ठरवले. त्यासरशी अमेरिकेने सीआयएच्या मदतीने आयेंदे यांचा मृत्यू घडवून आणला. विशेष म्हणजे चिलीतील लष्करी अधिकारी आयेंदे यांच्याविरुध्द बंड करायला तयार नसल्याने त्यांच्यावरही अमेरिकेने मोठा दबाव टाकला. हे सर्व कारस्थान किसींजर यांच्या सांगण्यावरून रचले गेले होते याची कबुली खुद्द अमेरिकेनेच वीस वर्षांपूर्वी दिली.

इंदिराजींच्या हातून पराभव
जगातील कोणत्याही देशामध्ये आपल्याला हवी तशी ढवळाढवळ करण्याचा अधिकार आहे असा अमेरिकेचा पूर्वापार समज आहे. किसींजर यांच्यासारखे उद्दाम अधिकारी सर्वोच्च पदावर असतात तेव्हा तर याचा कहर होतो. याच धोरणामुळे व्हिएतनामध्ये अमेरिकेने सैन्य घुसवले होते. तेथे अमेरिकेला मोठा पराभव पत्करावा लागला. नंतर अफगाणिस्तानमध्येही याचीच पुनरावृत्ती झाली. तरीही अमेरिका यापासून शिकण्यास तयार नाही. त्यावेळी रशियाला संपवणे हा एककलमी कार्यक्रम होता. त्यामुळे रशियाला सहानुभूती असलेल्या देशांनाही त्याचा फटका बसे. 1971 च्या बांगलादेश युद्धात भारताला याचा प्रत्यय आला. त्यावेळी भारताला पराभूत करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष निक्सन व त्यांचे सल्लागार म्हणून किसींजर यांनी जंग जंग पछाडले. पण इंदिरा गांधी त्या सर्वांना पुरून उरल्या. एकीकडे पाकिस्तान युध्दाच्या पवित्र्यात होता. अशा वेळी चीननेही भारताविरुध्द दुसऱ्या सीमेवरून युध्द सुरू करावे यासाठी किसींजर यांनी आकाशपाताळ एक केले. पाकिस्तान हा चीनचा मित्र असल्याने भारत त्याला त्रास देत आहे असा युक्तिवाद करून त्यांनी चीनचे माथे भडकावण्याचा प्रयत्न केला. कहर म्हणजे त्या दरम्यान ते एकदा दिल्लीत आले व त्यांनी सर्व मदत करण्याचे तोंड भरून आश्वासन दिले. पण त्याच वेळी गुप्त रीतीने त्यांची चीनशी चुंबाचुंबी सुरू होती. भारताला अमेरिकेतून कोणतीही लष्करी मदत मिळणार नाही याचा बंदोबस्त त्यांनी केला. सरतेशेवटी कशाचाही उपयोग होत नाही हे पाहिल्यावर खुद्द अमेरिकी नौदलाच्या बोटी बंगालच्या उपसागराच्या दिशेने आणून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण या कशालाही इंदिरा गांधी यांनी भीक घातली नाही. त्यामुळेच पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन बांगलादेश स्वतंत्र झाला. इंदिराजींसारख्या नवख्या आणि गरीब देशाच्या नेत्याने केलेला हा पराभव किसींजर कधीही पचवू शकले नाहीत. त्यामुळे ते कायम भारताविषयी वाईट बोलत राहिले.

चीनशी मतलबी मैत्री
किसींजर हे त्यांच्या देशासाठी नक्कीच उपयुक्त होते. उघडपणे ते लोकशाही मूल्ये वगैरेंची भाषा करीत. लेखक आणि वक्ते म्हणून ते नावाजलेले होते. जाहीर भाषणात ते लोकशाही मूल्ये वगैरेंबाबत बोलत. मात्र तो केवळ देखावा होता. प्रत्यक्षात अमेरिकेचे हितसंबंध जपण्याच्या नावाखाली ते कोणत्याही थराला जायला तयार असत. चिलीप्रमाणेच कंबोडिया, पूर्व तिमोर, अर्जेंटिना इत्यादी देशांमध्ये त्यांनी अत्यंत क्रूरपणे सैनिकी बळाचा वापर केला, तुफानी बाँबवर्षाव करून प्रदेशच्या प्रदेश बेचिराख केले. यात सुमारे चाळीस लाख लोकांचा मृत्यू झाला असावा असा दावा काही इतिहासकार करतात. अमेरिकेच्या लष्करी व आर्थिक ताकदीचा माज त्यांच्या या धोरणांमागे होता. मात्र अमेरिकेचा स्वार्थ असेल तेव्हा ते दुसऱ्या टोकालाही जायला तयार होते. याचे उदाहरण म्हणजे त्यांचे चीनबाबतचे धोरण. मुळात कम्युनिस्ट गटात रशियाला प्रतिस्पर्धी उभा करण्यासाठी चीनला आपण मदत करायला हवी हे त्यांनी सर्व अध्यक्षांच्या मनावर बिंबवले. त्यासाठी निवृत्त झाल्यावर त्यांनी खासगी फर्म काढून चिनी सरकारची वकिली केली. 1980 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. अमेरिका-चीन मैत्रीचे ते शिल्पकार वगैरे मानले जाऊ लागले. वयाच्या शंभराव्या वर्षी म्हणजे अलिकडेच जूनमध्ये ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना जाऊन भेटले होते. कारण एकच. अमेरिका व चीन यांच्यातला तणाव कमी व्हावा. चीनला अमेरिकी बाजारपेठ व भांडवल मिळण्यासाठी चीननेही त्यांना भरपूर वापरून घेतले. याबाबतीत चिनी नेते त्यांच्यापेक्षा वरचढ ठरले. किसींजर किंवा तत्सम प्रकारच्या अमेरिकी नेत्यांचे भारतातील काही मंडळींना फार कौतुक असते. पण प्रत्यक्षात गरीब देशांमधील सरकारे किंवा तेथील चळवळी चिरडून टाकण्यासाठी ज्यांनी सदैव आपले डोके शिणवले अशा नेत्यांचा नमुना म्हणजे किसींजर होय. निधनानंतर वैरे संपवावी वगैरे ठीकच. पण ज्यांनी आयुष्यभर गरीब जनतेसाठी लढणाऱ्या डाव्यांना संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना श्रध्दांजली वाहणे कठीण आहे.

Exit mobile version