मोदी-शहांच्या हुकुमशाहीचा हा पराभव- उद्धव ठाकरे

। मुंबई । प्रतिनिधी ।

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. काँग्रेससोबत असलेल्या भाजपविरोधी पक्षांनाही यामुळं काही प्रमाणात बळ मिळालं आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी या निकालावर भाष्य करताना मोदी-शहांवर जळजळीत टीका केली आहे.

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी आमदारांना मार्गदर्शन करताना त्यांनी कर्नाटकच्या निकालावरही भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, दक्षिण भारत हा आता पूर्णपणे भाजपच्या हातून गेलेला आहे. देशभरात सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारण लोकांना आवडलेलं नाही, हे कर्नाटकात दिसून आलं आहे. कर्नाटक निवडणुकीच्या माध्यमातून देशातील एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीच्या पराभवाला सुरुवात झाली आहे. सामान्य माणूसच हुकूमशहाचा पराभव करू शकतो, हा विश्वास कर्नाटकच्या जनतेने देशाला दिला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी कर्नाटकच्या जनतेचे विशेष आभार मानले.

भाजपला जनतेनं हद्दपार केलं आहे, तसेच आता महाराष्ट्रातूनही भाजपला हद्दपार करण्याची गरज आहे. मोदी-शहांच्या हुकुमशाहीचा हा पराभव आहे. प्रियंका गांधी व राहुल गांधींचे खास अभिनंदन.

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली. कर्नाटकमध्ये काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण मोदी व शहांच्या बळजबरी सत्तेचं जोखड कर्नाटकच्या जनतेनं निर्भयपणे फेकून दिले. कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली आणि जिंकली. 2024 सालच्या विजयाची ही नांदी आहे.

Exit mobile version