चौलच्या थंडगार ताडगोळ्यांना मागणी वाढली

पर्यटकांची खास पसंती

| रेवदंडा | प्रतिनिधी |

ताडगोळा म्हणजे उन्हाची काहिली कमी करणारे थंड, मधुर आणि रसाळ फळ. वाढत्या उन्हाच्या झळांमुळे शरीराला थंडावा मिळण्यासाठी ताडगोळ्यांना मागणी वाढत आहे. प्रतवारीनुसार 100 ते 150 रुपये डझन या दरात याची विक्री होत असून, पर्यटकांची खास पसंती मिळत आहे. चौल परिसरात ताडाची असंख्य झाडे असून, या झाडांपासून मिळणार्‍या ताडगोळे विक्रीतून चांगले उत्पन्न स्थानिक व्यावसायिकांना मिळत आहे.

ऐन उन्हाळ्याच्या दिवसात ताडगोळे थंडावा म्हणून पसंतीचे असते. त्यामुळेच मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरातून आलेले पर्यटक तसेच स्थानिकवर्ग ताडगोळे खरेदी करत असल्याचे चित्र रेवदंडा-चौल बाजारपेठेत दिसते. चौलमध्ये नारळ-पोफळीच्या बागेसह ताडाची झाडेसुद्धा विपुल असून, त्याला येणार्‍या फळांना ताडगोळे म्हणतात. या फळांतला गर पाणीदार व चवदार असून, उंच उंच ताडाच्या झाडावर चढून काढण्याचा व फळांतील गर काढण्यास कस लागतो. उन्हाळ्यात येत असलेल्या ताडगोळ्यांना बाजारात चांगली मागणी असते.

उन्हाळ्याच्या दिवसात अंगाची लाही लाही होत असताना नैसर्गिक थंडावा देणारे ताडगोळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून धरतात. अंगातील उष्णता कमी करणार्‍या ताडगोळ्यांचे आयुर्वेदातही अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत. ताडगोळे हे फळ ठराविक ॠतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यात उपलब्ध असणारे फळ आहे. यांची चव काहीशी शहाळ्यातील मलईसारखी लागत असून, चवीला हे फळ फारच मधुर असते. इंग्रजी भाषेत ‘आईस अ‍ॅपल’ म्हणून ओळखले जाणारे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी असल्याचे म्हटले जाते.

या फळाच्या सेवनाने शरीराला आवश्यक असलेले क्षार व इतर पोषक तत्त्वे संतुलित मात्रेमध्ये मिळत असतात, ज्यांना त्वचेवर उन्हाळ्यात सतत पुरळ येत असेल, तसेच ज्यांना या दिवसात चेहर्‍यावर मुरूमे येत असतील, त्यांच्यासाठी या फळाचे सेवन उत्तम आहे. या फळामध्ये कर्करोग प्रतिरोधी तत्त्वे असून, विशेषतः महिलांमध्ये आढळणार्‍या स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी या फळाचे सेवन उत्तम मानले जाते. या फळामध्ये अ‍ॅथोसायनिन नामक फायटोकेमिकल स्तनाच्या कर्करोगापासून बचाव करणारे आहे.

आरोग्यासाठी या फळाचे फायदे मिळविण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या फळाचे भरपूर सेवन करावे. वाढत्या उकाड्यात सध्या सारेच हैराण झाले असतात, घशाला पडणार्‍या कोरडावर उपाय म्हणून बाजारातील शितपेय किंवा बर्फाचे गोळ्यांवर ताव मारतात, परंतु कृत्रिम थंडाव्यापेक्षा ताडगोळ्यांसारखा नैसर्गिक उपाय केव्हाही आरोग्यासाठी चांगलाच परिणामकारक ठरतो. ज्यांना वजन घटवायचे असेल, त्यांच्यासाठी या फळाचे सेवन उत्तम आहे. या फळाच्या गरामुळे तसेच फळातील रसामुळे भूक शमविण्यास मदत होते, त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. ज्यांना लिव्हरच्या संबंधित काही विकार असतील, त्यांच्यासाठी ताडगोळ्यांचे सेवन उपयुक्त आहे. या फळामध्ये पोटॅशियम मुबक मात्रेमध्ये असून, लिव्हरमध्ये साठलेले घातक, विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. या फळाच्या सेवनाने शरीराला श्रम करण्याची आवश्यक ताकद व ऊर्जा मिळते. या फळाच्या सेवनाने शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढत असल्याने दिवसभरासाठी लागणारी ताकद या फळाच्या सेवनातून मिळत असते.

अशा या गुणकारी ताडगोेळे फळांची फार मोठी मागणी उन्हाळ्यात पर्यटक व स्थानिक वर्ग करत असतो. चौल परिसरात आर्थिक उत्पन्न देणारे ताडवृक्ष असंख्य संख्येने असून, या ताडाच्या वृक्षाच्या लागवड करणे दिवसेंदिवस गरजेचे आहे.

Exit mobile version