महिला पालकमंत्री हटावची मागणी दुर्दैवी

तटकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
। सुतारवाडी । वार्ताहर ।

रायगडचे पालकमंत्री म्हणून अडीच वर्षे काम करताना अदिती तटकरे यांनी अत्यंत चांगले काम केले असतानाही राष्ट्रवादीच्या विरोधकांनी महिला पालकमंत्री हटावसाठी फोडलेला टाहो अत्यंत क्लेशदायक आणि दुर्दैवी होता,अशी खंत खा.सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हाध्यक्षपदी मधूकर पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक सुतारवाडी येथे गीताबाग मध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, कार्याध्यक्ष मधुकर पाटील, प्रशांत पाटील, विजयराव मोरे, उमाताई मुंढे, अंकित साखरे, महिला युवती अध्यक्षा सायली दळवी, उत्तम जाधव, महमद भाई, अपेक्षा कारेकर, सुधाकर घारे, सुरेश मगर त्याचप्रमाणे नगरसेवक युवक-युवती रायगड जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यांतील पदाधिकारी, महिला उपस्थित होते.

बैठकीत बोलताना तटकरे यांनी राष्ट्रवादी विरोधकांचा समाचार घेतला. महिला पालकमंत्री हटाव हा विरोधकांनी फोडलेला टाहो अत्यंत दुर्दैवी असून, अदिती तटकरे यांनी पालकमंत्री प्रथम रायगड जिल्ह्यातून झाली. असे काय केले होते की पालकमंत्री हटाव असा टाहो फोडला गेला. अदितीताई रायगडच्या पालकमंत्री झाल्या तेव्हा रायगड जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू केले. यावेळी उद्घाटनासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन भाषणातून अदिती तटकरे यांचे कौतूक केल्याची आठवणही तटकरे यांनी यावेळी केली.

आता नवीन सरकार केव्हा स्थापन होते यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. येणार्‍या निवडणुकांसाठी सर्वांनी भक्कम ताकदीने तयार रहा. प्रत्येक ठिकाणी विकास कामांचा आणि विचारांचा झेंडा फडकवा, असे आवाहनही त्यांनी केले. ज्यांना सोंग करायची सवय ते सांगतात की राष्ट्रवादीने आम्हाला निधी दिला नाही आणि टीकेचा केंद्रबिंदू राष्ट्रवादीला केला. मात्र आम्ही खंबीरपणे आहोत आम्ही कोणात्याही टीकेला घाबरत नाहीत.

आमचे नेतृत्व खंबीर आहे येईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, राष्ट्रवादी म्हणजे फक्त राजकारण नाही तर समाजकारण ही आहे. स्वर्गीय प्रभाकर पाटील यांनी अकरा वर्षे जिल्हा परिषद कशी उत्तम प्रकारे चालवली याची आठवण करून दिली. विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव दिल्याबद्दल शिंदे सरकारला धन्यवाद दिले. येणार्‍या निवडणुका संपेपर्यंत मधुकर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहतील असे सांगून त्यांचा सत्कार केला.

Exit mobile version