उपोषणकर्त्यांची घेतली भेट; पाठीशी असल्याचे आश्वासन
| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल्या दहा दिवसांपासून कोळी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन कोळी समाजाची मागणी रास्त आहे. त्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा, अशी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी गुरुवारी केली.
अनुसूचित जमातीचे दाखले मिळूनदेखील पडताळणीमध्ये ते रद्द केले जात आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून कोळी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. यावेळी पंडित पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी पंडित पाटील म्हणाले, कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज लढा देत आहे. फक्त सरकार त्यांना आश्वासन देते. त्याची अंमलबजावणी होत नाही. घटनेने त्यांना संविधानिक हक्क दिला आहे. कोळी समाजाचे दाखले रद्द होतात. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. सरकारने कोळी समाजाच्या दाखल्यांचा प्रश्न तातडीने सोडविला पाहिजे. कोळी समाज संपूर्ण महाराष्ट्रात आहे. संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू आहे. राज्य सरकार ज्याप्रमाणे इतर समाजाकडे लक्ष देते, त्याप्रमाणे कोळी समाजाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. कोळी समाजावर सरकार अन्याय करीत असल्याने या समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. कोळी समाजाचा व्यवसाय समुद्राच्या लहरीवर आहे. निसर्ग चक्रीवादळात कोळी समाजाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक वादळांमध्ये त्यांचे नुकसान होत आहे, मात्र त्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. सवलतीच्या दरामध्ये कोळी समाजाला कर्ज द्यायला पाहिजे. त्यांचा धंदा निसर्गावर अवलंबून आहे. रायगड जिल्ह्यातील खाडी, नद्या, प्रदूषणामुळे खराब झाल्या आहेत. त्यामुळे मच्छिमारांवर उदरनिर्वाह करायचा कसा, हा मोठा प्रसंग आला आहे.
आमदार फिरकलेच नाही; उपोषणकर्ते नाराज गेल्या 75 वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेला हक्क आम्ही मागत आहोत. पण, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कोळी समाजावर फार मोठा अन्याय सरकारने केला आहे. अनेक वेळा सरकारकडे आमचे हक्क मागण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे 23 जानेवारीपासून उपोषण सुरु केले आहे. ज्यांना निवडून दिले, ते आ. महेंद्र दळवीदेखील फिरकले नाहीत. आता त्यांची मर्जी असेल, पण निवडणुकीला आमची मर्जी असेल, असा इशारा यावेळी त्यांनी आमदारांना दिला.