नराधमास पोलिसांकडून अटक
| अलिबाग | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथी आठ वर्षीय चिमुरडीवर 49 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी (दि. 31) सायंकाळी साडेसातच्या ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, पीडित चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने रायगड जिल्ह्यासह संपूर्ण तालुका हादरला असून, आरोपीला फासावर चढवा, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
जयपाल महादेव भनगोजी (49) वर्षे रा. दिघी असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी, त्याची मुले, पत्नी असे एकत्र राहात आहेत. त्याचा टेम्पो चालविणे हा व्यवसाय आहे. तो राहात असलेल्या घरापासून काही अंतरावर पीडित मुलीचे घर आहे. ती त्याला मामा म्हणून हाक मारते. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा नराधम तिला त्याच्या दुचाकीवर बसवून घरापासून काही अंतरावर मोकळ्या जागेत झोपडीजवळ घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यामध्ये तिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मुलीवर अत्याचार केल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर जयपाल याच्याविरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नराधम जयपालला अटक केली. त्याच्याविरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुरुवारी (दि.31) त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलीचे आई, वडील मोलमजुरी करीत असून, या घटनेने त्यांच्यामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेली घटना निंदनीय आहे. आरोपीला तात्काळ अटक केली आहे. आरोपीला कठोर शिक्षा होईल या दृष्टीने जास्तीत जास्त पुरावे गोळा केले जातील. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. अधिक तपास सुरु आहे.
हनुमंत शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,
दिघी सागरी पोलीस ठाणे