वाळवटीचा पाणीप्रश्‍न ऐरणीवर

दोन महिने पाणीपुरवठा नाही; मुरुड पंचायत समितीवर धडक मोर्चा

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील वाळवटी आगरी समाज व बौद्धवाडी या भागात गेले दोन महिने पाणीपुरवठा होत नसल्याने शनिवारी शेकडोंच्या संख्येने वाळवटी आगरी समाजाच्या महिला व पुरुषांनी परेश हॉटेलपासून ते मुरुड पंचायत समितीपर्यंत शांततेत मोर्चा काढला. तद्नंतर ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन विस्तार अधिकारी सुभाष वाणी यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी शिवसेनेचे तालुका संघटक यशवंत पाटील, सुषमा पाटील, अनिता पाटील, महिला अध्यक्ष सुवर्णा सातमकर, समाज अध्यक्ष विठ्ठल घरत, अशोक मुंबईकर, शैलेश पाटील, विशाल पाटील, रामा पाटील, मधुकर घरत, सागर पाटील, दिपक पाटील, संध्या तेलघे, संगिता मुंबईकर, माधुरी पाटील, कैलास पाटील, संतोष पाटील, अनिल मुंबईकर आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील वाळवंटीकरिता जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून 44 ते 45 लाख रुपये खर्च करून काम चालू केले आहे. ते काम पूर्णतः अपूर्ण स्थितीत आहे. झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हा परिषद रायगड पाणीपुरवठा, पंचायत समिती मुरुडकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत, तरी शासनाचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत, असा आरोपही ग्रामस्थांनी केला.

पाणीपुरवठा विभागातील अभियंता निहाल चवरकर हे दोन महिन्यांपासून आपल्याकडे पाणी येईल असे फक्त आश्‍वासन देत आहेत. वाळवटीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी असूनसुद्धा लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, ही अतिशय वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत चालू झाला नाही, तर मुंबई-मुरुड या मुख्य रस्त्यावर उसरोली टेपावर रास्ता रोको करण्यात येईल व त्यांच्यामुळे काही नुकसान झाल्यास त्यांची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असे या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, पाणीपुरवठा अभियंता निहाल चवरकर यांचा फोन बंद असल्याने त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

मी दोन दिवसांत घटनास्थळी येऊन पाहणी करीन. ग्रामस्थांना कसं पाणी मिळेल त्याची दक्षता घेण्यात येईल. तसेच पाणीपुरवठा अभियंता यांची चौकशी करण्यात येईल.

राजेंद्रकुमार खताळ, गटविकास अधिकारी

गावात पाणी असूनसुद्धा ठराविक समाजाला पाणी मिळते, आम्हाला पाणी मिळत नाही याचा आम्ही निषेध करतो. हा प्रकार निंदनीय आहे. याची चौकशी होऊन अधिकार्‍यांवर कडक कारवाई करावी जेणेकरून हा प्रकार कुठल्या गावात घडणार नाही. येत्या दोन दिवसांत पाणी मिळाले नाही तर याठिकाणी मोठा उद्रेक होईल.

यशवंत पाटील, शिवसेना तालुका संघटक
Exit mobile version