| आगरदांडा | गणेश चोडणेकर |
मुरुड ग्रुप ग्रामपंचायत उसरोलीमधील वाळवटी ग्रामस्थांना गेले सात वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा तक्रारी करुनही प्रशासनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अखेर प्रशासनाविरोधात गुरुवारी (दि.22) शेकडो महिला व ग्रामस्थांनी मुरुड परेश नाक्यापासुन ते मुरुड पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला.
यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच कार्यालयासमोर ठेकेदाराला शिक्षा झाली पाहिजे, वाळवंटी ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. यावेळी यशवंत पाटील, इन्तिखाब खतीब, शब्बीर खतीब, शौखत नाखावाजी, शैलेश पाटील, नजीर नाखावजी, दिनेश मिनमिने, मनोज कमाने, अरविंद गायकर, भरत बेलोसे, यशवंत पाटील, इन्तिखाब खतीब, शब्बीर खतीब, शौखत नाखावाजी, शैलेश पाटील, रविकुमार मुंबईकर, आजीम हुर्जुक, शैलेश पाटील, साजीत कळवसकर, अर्शद मुकरी, मकबुल खतीब, नजीर नाखावजी, मनोज पाटील, मुबश्शीर फकी, जुनेद शमराजकर, सिराज बोदले, आब्दन नाखवाजी आदिंसह शेकडो महिला उपस्थित होत्या.

उसरोलीमधील वाळवटी गावासाठी 2017-18 मधील पेयजल योजने अंतर्गत 75 लाख, दलित वस्तीच्या माध्यमातून सुमारे 10 लाख व जलजीवन मिशन अंतर्गत 44 लाख रुपये वाळवंटी गावासाठी मंजूर झाले. एकूण 1 कोटी 20 लाख एवढी रक्कम खर्च करून वाळवटी गाव पाण्यापासून वंचित आहे. पेयजल योजनेचे सुमारे 70 लाख रुपये खर्च करुनही 2017 पासून आजपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. तरी या कामाची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. याशिवाय दलित वस्ती या योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेले 10 लाख रुपयांचे बील तत्कालीन सरपंच व अधिकाऱ्यांनी संगनमत करून कोणतेही काम न करता काढले व अपहार केला असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुमारे 44 लाख रुपये मंजूर असून यातील 23 लाख रुपये खर्ची पडले आहेत. तसेच या निधीतून झालेले काम हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असून तत्कालीन सरपंच व अधिकाऱ्यांनी संगनमत करून बिल काढले आहे. तर उर्वरीत 18 लाख रुपये हे त्यांना न देता त्या ठेकेदारवर गुन्हा दाखल करून तो ठेका रद्द करण्यात यावा व नवीन ठेकेदार नेमण्यात यावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
या संदर्भात मुरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, पाणीपुरवठा उप अभियंता निहाल चवरकर यांनी घटनास्थळी जाऊन उपोषणकर्त्यांनी पत्र देऊन आमरण उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला. यावेळी मुरुड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बडगर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.