अनधिकृत भराव, जलपर्णीचा वेढा, पात्रातील सांडपाणी; उपाययोजना करा, पेणकरांची मागणी
| पेण | प्रतिनिधी |
पेणकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या भोगावती नदीच्या पात्रामध्ये गेल्या दोन-तीन वर्षांत अनधिकृतरित्या भराव टाकून मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्याने पात्र छोटे होत चालले आहे. त्याप्रमाणे अनेक ठिकाणी नदीला जलपर्णीने वेढा घातला असून, सांडपाणीदेखील थेट नदीत सोडले जात आहे. त्यामुळे पाणी प्रदूषण झाले असून, पाण्याला दुर्गंधीदेखील सुटलेली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भोगावतीच्या नशिबी हे भोग आले आहेत, असा आरोप पेणकरांकडून करण्यात येत आहे. आता तरी, नगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
नदीच्या पिंपळडोह परिसराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याला खाजदेखील सुटली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पेण शहरातील सांडपाण्याची दोन गटार पिंपळडोहाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला येऊन मिळत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रदूषण होऊन पाण्याला दुर्गंधीदेखील सुटलेली आहे. वेळीच भोगावती नदीसंवर्धनाचे काम हाती घेतले नाही तर पेणकरांना पिण्यासाठी दूषित पाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण आजही पिंपळडोहाचेच पाणी पंपाने उचलून जलशुद्धीकरण केंद्रावर नेले जाते आणि तेच पेणकरांना पिण्यासाठी दिले जात आहे.
आज भुंड्या पुलावर पेण नगरपालिकेच्या विसर्जन घाटाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; परंतु त्याच्याच पुढे विश्वेश्वर स्मशानभूमीपासून पुढे नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याचे दिसत आहे. या जलपर्णीला वेळीच आवर न घातल्यास भोगावती नदी कधीच मोकळा श्वास घेऊ शकणार नाही, एवढे निश्चित. पेण नगरपालिकेकडून माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत नदीतील जलपर्णी काही प्रमाणात काढली; परंतु महिना-दोन महिन्यांच्या अंतराने पुन्हा जलपर्णी आहे त्याच स्थितीत झाली आहेत. कारण, एक बाजूला नदीचा एक तीर नगरपालिकेच्या हद्दीत, तर दुसरा तरणखोप ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. जरी नगरपालिकेकडून एक बाजू स्वच्छ केली असली, तरी दुसऱ्या बाजूने जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
उपाययोजना करणे गरजेचे
भोगावती नदीला प्रदूषणमुक्त व जलपर्णीमुक्त करायचे असेल तर ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांनी एकत्र येऊन संयुक्त कार्यक्रम घ्यावा लागेल. कारण, नदीमध्ये जे अतिक्रमण झालेले आहे, तेदेखील पेण शहराच्या बाजूने न होता तरणखोप गावाच्या बाजूने झालेले आहे. त्याला थांबविणे गरजेचे आहे. तसेच भोगावती नदीच्या पिंपळडोहात जे पेण शहराचे सांडपाणी सोडले जाते, त्याला तातडीने थांबविणे गरजेचे आहे. कारण, सांडपाण्याच्या निचऱ्यामुळे पाण्यात युरियाचे प्रमाण वाढून जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यासह नदीच्या दोन्ही तीरांवर असणाऱ्या नागरिकांनी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजचे आहे.
नदीसंवर्धनासाठी मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार
भोगावती संवर्धन संघटनेचे प्रा. उदय मानकावळे यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले की, गेली दोन वर्षे मी नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला; परंतु उचित प्रतिसाद न मिळाल्याने मी मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केला आहे. भोगावती नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.
