उड्डाणपूल उभारण्याची स्थानिकांची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेवरील कर्जत या रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जात आहे. त्यात मुंबई- कर्जत मार्गावर चार मार्गिका टाकल्या जाणार आहेत. त्यानंतर पनवेल-कर्जत या मार्गाच्या दोन मार्गिका यादेखील कर्जत येथे येणार आहेत. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकाचे नवीन उपनगर विकसित केले जात आहे. मात्र, या नवीन कर्जत उपनगर रेल्वे स्थानकामुळे मध्य रेल्वेवरील देऊळवाडी येथे असलेले फाटक क्रमांक 27 हे बंद होणार आहे. दरम्यान, त्या ठिकाणी मध्य रेल्वे प्रशासनाकडून उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
मुंबई-पुणे या मध्य रेल्वेवर कर्जत या स्थानकाचा कायापालट होत आहे. या ठिकाणी एकाच वेळी अनेक मार्गिका नव्याने टाकण्यात येत आहेत. त्यामुळे सध्याचे कर्जत स्थानक अपुरे पडणार आहे हे लक्षात घेऊन कर्जत उपनगर रेल्वे स्थानक विकसित केले जात आहे. या स्थानकातून भविष्यात कर्जत-मुंबई मार्गासाठी चार मार्गिका तसेच पनवेल-कर्जत येथील दोन मार्गिका अशा अनेक मार्गिका नव्या कर्जत उपनगर रेल्वे स्थानकात येत आहेत. या नवीन मार्गिका टाकण्यात येत असताना त्यासाठी लागणारे अंतर हे किमान 100 मीटर आहे. त्याचा थेट परिणाम कर्जत भिवपुरी रोड या स्थानकाच्या मध्ये असलेल्या देऊळवाडी गावाच्या हद्दीत असलेले मध्य रेल्वे वरील फाटक क्रमांक 27 हे बंद होणार आहे. सध्या नवीन मार्गिका टाकण्याचे काम रेल्वेकडून सुरु आहे. देऊळवाडी येथील फाटक क्रमांक 27 हा सध्या सुरु कार्यरत आहे. मात्र, त्या भागात काही दिवसांनी नव्या मार्गिका टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे हे फाटक कायमचे बंद होणार आहे. मध्य रेल्वेवर मुंबई-पुणे मार्ग तयार झाला तेव्हापासून देऊळवाडी येथील फाटक कार्यरत आहे.
शेतकर्यांना बसणार फटका
आगामी काळात देऊळवाडी गावाच्या हद्दीतील मध्य रेल्वेवरील फाटक बंद केले जाणार असून, त्याचा थेट फटका हा या गावातील शेतकर्यांना बसणार आहे. देऊळवाडी गावातील अनेक शेतकर्यांच्या जमिनी या गावाच्या मागे असलेल्या रेल्वे मार्गाच्या पलीकडे आहेत. ते फाटक बंद झाल्यानंतर त्या भागातून सहा ते आठ मार्गिका असणार आहेत. त्यामुळे त्या मार्गिका पार करून कोणताही शेतकरी आणि शेती करण्यासाठी बैलजोडी घेऊन जाण्याचे दिव्य कसे पार पाडणार? असा मोठा प्रश्न देऊळवाडी गावातील शेतकर्यांना पडला आहे.त्यामुळे शेतकर्यांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने उड्डाण पूल बनवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.